वसई: वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि लोकल मधील अंतर प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. या अंतरामुळे घाई घाईत चढ उतार करताना प्रवासी त्यात अडकून अपघाता होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली असून त्यावर रेल्वे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पुढे आली आहे.

पश्चिम रेल्वे वरील गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक म्हणजे वसई रेल्वे स्थानक. रोज लाखो प्रवासी वसई ते विरार आणि चर्चगेट ते वसई असा प्रवास करतात. चर्चगेटहून विरारला जाणारी लोकल वसई स्थानकात फलाट क्रमांक २ किंवा मग फलाट क्रमांक ४ वर येऊन थांबते. पण, फलाट क्रमांक ४ आणि लोकलमधील अंतरामुळे इथे उतरणाऱ्या प्रवाशांना लोकलमधून उतरताना बरीच खबरदारी घ्यावी लागते. गर्दीच्यावेळी लोकलमध्ये चढण्याची गडबड सुरू असताना प्रवाशाचा पाय फलाट आणि लोकलच्या फटीत अडकून अपघात होण्याची शक्यता यामुळे संभवते. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या या फलाटावर थांबत असल्यामुळे इथे प्रवाशांची गर्दी असते. तसेच, अनेकदा स्वयंचलित जिन्यांनी पुलावर जाण्याकरता प्रवासी संपूर्ण फलाट ओलांडतात. यादरम्यान किंचित धक्काबुक्की झाल्यास ती गंभीर अपघाताचे कारण ठरू शकते.

वसई स्थानकात गर्दीच्यावेळी फलाट क्रमांक ४ वर उतरताना अचानक खोल खड्ड्यात पडल्यासारखा भास होतो असं दहिसर ते वसई प्रवास करणारे प्रवासी विनोद मिश्रा यांनी सांगितले आहे. फलाट क्रमांक ४ आणि लोकलमधील या अधिकच्या अंतरामुळे अपंग, वृद्ध प्रवासी, गरोदर स्त्रिया, तसेच लहान मुलांसोबत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या समस्येची दखल घेत, यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता संबंधित विभागाला कळवून त्याची माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

वाढत्या गर्दीमुळे चिंता

पश्चिम रेल्वे वर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गर्दीतून प्रवास करणे अधिकच जिकरीचे बनले आहे. अनेकदा प्रवासी धावती लोकल पकडताना फलाटावर किंवा मग लोकलच्या फटीत अडकून अपघात घडले आहेत. यासाठी रेल्वे सतर्कता बाळगून याठिकाणी उपाययोजना करा अशी मागणी करण्यात येत आहे.