भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील लहान मुलांना सुरक्षित वाहतुकीचे शिक्षण देण्यासाठी महापालिकेकडून ‘ट्रॅफिक’ उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे.शहरातील पहिलेच असे आगळ्यावेगळ्या स्वरूपाचे हे उद्यान आहे.गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करून नागरिक व मुलांसाठी वापरासाठी खुले करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर हे शहर संपूर्ण राज्यभरात ‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळखले जावे, असा महापालिकेचा संकल्प आहे. या उद्देशाने गेल्या काही वर्षांत प्रशासनाने नव्वदहून अधिक उद्याने विकसित करून नागरिकांसाठी खुली केली आहेत. तसेच उर्वरित आरक्षणांवरील उद्यानेही विकसित करून त्यामध्ये नाविन्य आणण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यानुसार मिरा रोड येथे ‘ट्रॅफिक उद्यान’ विकसित करण्यात आले आहे.

मिरा रोडच्या आरक्षण क्रमांक २५६ या जागेवर उभारलेल्या या ट्रॅफिक पार्कचे एकूण क्षेत्रफळ २ हजार ३६५ चौरस मीटर आहे. लहान मुलांना खेळता खेळता वाहतूक नियमांचे शिक्षण मिळावे, तसेच नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या उद्यानाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

उद्यानाची वैशिष्ट्ये :

उद्यानात प्ले एरिया, बसण्याची सोय, वाहतुकीच्या सांकेतिक खुणा, तसेच मुलांसाठी कमांडो वॉल, क्लायम्बिंग वॉल, स्विंग ब्रिज आणि विविध प्रकारचे टनेल्स उभारण्यात आले आहेत. या उद्यानाच्या उभारणीसाठी शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा निधीतून आर्थिक मदत मिळाली असून, याशिवाय मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीमधूनही योगदान देण्यात आले आहे.

माजी आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे नाव

नव्याने उभारण्यात आलेल्या या ट्रॅफिक उद्यानाला दिवंगत माजी आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे नाव देण्यात आले असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. गुरुवारी मेंडोन्सा यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या उद्यानाचा मोठा फायदा येथील नागरिक व लहान मुलांना होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.