वसई: लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरलेली रेल्वे आता प्रवाशांच्याच जीवावर बेतू लागली आहे. दररोज वसई विरारमधून लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. तर पनवेल, दिवा या ठिकाणी जाणारे प्रवासी मेमू ट्रेनचा पर्याय निवडतात. पण, वसई-दिवा मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, या मार्गावर वाढलेले प्रवाशांची गर्दी आणि उशिराने येणारी लोकल यामुळे हजारो प्रवाशांना दररोज अक्षरशः जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती किती गंभीर आहे, याचे पुरावे देणारी चित्रफित सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. तर ही व्हायरल चित्रफित पाहून प्रवाशांचा संतापही आता अनावर झाला आहे.
दिवसेंदिवस या मेमू लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या स्फोटक वेगाने वाढत आहे, मात्र लोकलच्या फेऱ्या ‘जैसे थे’ आहेत. यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दीची परिस्थिती निर्माण झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने दिवा, पनवेल, ठाणे, कल्याण या भागांमध्ये ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची रोजची कोंडी होत आहे. यासाठी वसई दिवा मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
या प्रवासाचं वास्तव सांगणारी एक चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या चित्रफितीत वसई स्थानकात येऊन थांबलेल्या मेमू लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची सुरू असलेली चढाओढ दिसून येत आहे. चाकरमानी, फेरीवाले आपल्या सामानासह लोकलमध्ये चढताना एकमेकांना ढकलताना, आरडाओरड करताना, चढलेल्या प्रवाशाला खेचून स्वतः ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना तर काही प्रवासी थेट ट्रॅकवर उतरून दुसऱ्याबाजूने ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
ही चित्रफित व्हायरल करणारे प्रवासी दीपक मिश्रा यांनी प्रवाशांना तोंड द्यावा लागणाऱ्या समस्यांवर देखील या चित्रफितीत भाष्य केले आहे. वसई -दिवा लोकल ही विरार डहाणूपर्यंत वाढविल्यास त्याचा फायदा होईल कारण अनेक प्रवासी हे वसईच्या पलीकडे ही प्रवास करतात. याशिवाय वाढती गर्दी लक्षात घेता ही लोकल मुंबई लोकलमध्ये अपग्रेड केल्यास त्याचा चांगला फायदा प्रवाशांना होईल, असेही त्यांनी या म्हंटले आहे.
