वसई : नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे चोरांनी एका घरातून ३३ लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर घरालाच आग लावल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकऱणी नायगाव पोलिसांनी तपास करून ८ तासाच चार आरोपीना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे.
नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे हर्षद म्हात्रे (३९) यांचा भिमाई नावाचा बंगला आहे. त्याला लागूनच कामिनी नावाचे किराणा मालाचे नावाचे दुकान आहे. सोमवारी हर्षद म्हात्रे हे गणेशोत्सवाच्या सणानिमित्त विरार येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. घरात कोणी नसल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी गच्चीवरून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील ३३ लाखांचे दांगिने लंपास केले.चोरी करून झाल्यानंतर चोरट्यांनी लागूनच असलेल्या किरणा मालाच्या दुकानाला आग लावली. या आगीचे लोळ बाहेर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.यावेळी पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या चोरीच्या घटनेप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४), ३२६ (जी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ तासात चार आरोपींना अटक
घरफोडी प्रकरणात नायगाव पोलिसांनी अवघ्या ८ तासातच तपास करून चार आरोपींना अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. अजय यादव (२०), सोनू फैजान खान (२०), दीपक खरात (२१), फातिमा शेख (२५) अशी अटक आरोपींची नावं असून त्यांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांनी सांगितले आहे.