विरार : दिवसेंदिवस पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने नागरिक अधिक जागरूक झाले असून, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढताना दिसत आहे. वसई विरार परिसरातही या मूर्तींना पंसती मिळत आहे.

वसईत दरवषी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. यातही घरगुती गणपतींची संख्या मोठी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तीं या पर्यावरण पूरक नसल्याने विसर्जन केल्यानंतरही मुर्त्यांचे अवशेष तसेच राहतात. यासाठी अनेक जण आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करतात. यात कागदाच्या लगद्यापासून, गोमय गणेश तसेच लाल मातीचा वापर करून साकारण्यात येणाऱ्या वृक्ष गणेश अशा पर्यावरण पूरक मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती बाराशे रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत अशा किमतींमध्ये उपलब्ध असतात.

विरार पश्चिमेच्या अथर्व आर्ट या गणेशशाळेत गेल्या सात वर्षांपासून केवळ पर्यावरणपूरक आकर्षक गणेशमूर्तीं साकारल्या जात आहेत. त्यांच्याकडे आठ इंचापासून ते ३ फुटापर्यंतच्या मूर्तीं तयार केल्या जातात. यात वृक्ष गणेश, कागदी मूर्ती आणि लाल मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचा समावेश आहे. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता मात्र करोनानंतर पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना असलेली मागणी वाढत आहे असे मूर्तिकार सुनील कवडे यांनी सांगितले. या मूर्ती वजनाने हलक्या असल्याने तसेच अगदी घरीही विसर्जन करता येणे शक्य असल्याने नागरिकांची या मूर्तीना पसंती मिळत आहे. अगदी मुंबई आणि ठाण्यातूनही मागणी असल्याचे ते पुढे म्हणाले.

विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरातील शिल्पकार नितीन पोतनीस हे मागच्या चार वर्षांपासून गोमय गणेश साकारत आहेत. यात मुख्य घटक गाईचे शेण आणि त्यासोबतच गोंद वापरून तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करून या मूर्ती तयार केल्या जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत मात्र पीओपीच्या मुर्तींचे विसर्जनानंतर अवशेष शिल्लक राहतात हे पाहून ते पर्यावरण पूरक गणेशमूर्तींकडे वळले. सध्या प्रतिसाद चांगला असला तरीही अजून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत जागरूकता वाढायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले. वसई पश्चिमेच्या पारनाका येथील श्री विनायक कलाविष्काराच्या निहीरा पंडित गेल्या नऊ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवत आहेत. पारंपरिक शाडू मूर्तीसोबत त्या कागदी लगदा आणि लाल माती पासून मूर्ती तयार करतात. पर्यावरणपूरक मूर्तीना मिळणार प्रतिसाद आणखीन वाढायला हवा असे त्या म्हणाल्या.

सुरुवातीला नारिकांचा अल्प प्रतिसाद होता. पर्यावरण पूरक मूर्तीना मागणी येणार नाही असेही काहींनी सांगितले. मात्र ३० वर्षे विविध माध्यमातून गणेश मूर्ती साकारल्यानंतर मी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. आता मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. – सुनील कवडे, मूर्तिकार

पर्यावरणपूरक गणेश मुर्तींमध्ये कागदाच्या लगद्यापासून, गोमय गणेश तसेच लाल मातीचा वापर करून साकारण्यात येणाऱ्या वृक्ष गणेश अशा पर्यावरण पूरक मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती बाराशे रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत अशा किमतींमध्ये उपलब्ध असतात.