वसई – मुंबई पोलिसांनी नालासोपारा पेल्हार येथे धाड टाकून अमली पदार्थाचा कारखाना उध्वस्त केला होता. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता पोलीस अंमलदार सुजय पाटील यांचे ही निलंबन करण्यात आले आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या सोबत त्यांचे संबंध असल्याने ही कारवाई केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई परिमंडळ सहाच्या पथकाने नालासोपाऱ्यात कारखान्यावर छापा टाकून साडेतेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करून याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती. या झालेल्या कारवाईचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत.

विशेषतः हा कारखाना पेल्हार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच सुरू असताना पोलिसांना याची माहिती नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन केले होते. तर याच दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ही करण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ आता पेल्हार पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार सुजय पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी आदेश काढले आहेत.

ठपका काय ?

मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती. या कारवाईनंतर सहायक पोलीस आयुक्त विरार विभाग यांनी ही सविस्तर चौकशी केली होती. या कालावधीत अंमलदार सुजय पाटील यांचे असामाजिक व अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सोबत संबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटील यांचे भ्रमणध्वनी पडताळणी केली असता त्यांचे अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या सोबत संबंध तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आहे.या प्रकरणी प्राथमिक चौकशी साठी सहायक पोलीस आयुक्त विरार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.