वसई:- वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. याचा मोठा फटका वाहनचालकांचा बसू लागला आहे. या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी पालिकेने कोट्यावधी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. यात खड्डे दुरूस्तीसाठी ६८ कोटी तर आठ रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी ५५ कोटीं रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.

पावसामुळे वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तर काही वेळा या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत आहे. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, अशी घोषणा पालिकेकडून  करण्यात आली. त्यानुसार पालिकेने  विविध ठिकाणी खडीकरण, डांबरीकरण करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र नवरात्री उत्सव संपला तरी सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती योग्य रित्या झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यातच मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे या पावसात दुरूस्त केलेले रस्ते पुन्हा उखडले असून रस्त्यांची अक्षरशः बिकट अवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिकेकडे वाढू लागल्या आहेत. अखेर पालिकेने शहरातील खड्डे दुरुस्ती व प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण यासाठी नुकताच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात आठ प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करून नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी ५५ कोटी ७९ लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.

असे आहेत आठ रस्ते 

  • बापाणे फाटा ते नायगाव रेल्वे स्थानक (पूर्व) – ११ कोटी ३३ लाख
  • सातीवली खींड ते रेंज ऑफीस – १३ कोटी ७४ लाख
  • रेंज ऑफीस ते गोखीवरे तलाव – २ कोटी ५८ लाख 
  • गोखिवरे तलाव ते माणिकपूर नाका – ५ कोटी ८४ लाख 
  • माणिकपूर नाका ते दत्तानी मॉल – १० कोटी ३० लाख 
  • दत्तानी मॉल ते वसई गाव – ४ कोटी १३ लाख 
  • वालीव गाव ते रेंज ऑफीस – ६ कोटी १९ लाख
  • बंगली रुग्णालय ते देवतलाव – १ कोटी ७२ लाख
  • एकूण – ५५ कोटी ७९ लाख ३६ हजार ६५७

खड्डे दुरुस्तीसाठी ६८ कोटी 

वसई विरार शहरात मुख्य रस्त्यासह नऊ प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर ही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा ही मोठा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात नऊ प्रभागातील खड्डे दुरुस्तीसाठी ६८ कोटी २७ लाखांचा निधी खर्च केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे.

पालिकेकडून वेळोवेळी रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र निकृष्ट दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे अवघ्या काही काळातच बुजवलेले रस्ते पुन्हा उखडले जातात. यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जात असल्याबद्दल शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुरुस्तीची कामे योग्य पद्धतीने होत आहेत किंवा नाही याचे परीक्षण पालिकेडून गांभीर्याने करण्यात यावे अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. 

रस्त्यांचे नूतनीकरण व खड्ड्यांची दुरुस्ती या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तातडीने रस्त्यांची कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येतील. -प्रदीप पाचंगे, प्रभारी शहर अभियंता महापालिका