वसई: वर्षभरापूर्वीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अवघ्या वर्षभरात विविध ठिकाणच्या भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. यातून सुटका व्हावी यासाठी महामार्गाचे काँक्रिटिकरण करण्यात आले आहे. या काँक्रिटिकरणाचे काम पूर्ण होऊन अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. याच दरम्यान महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वर्सोवा पूल ते विरार फाट्या दरम्यान ससूनवघर, मालजीपाडा, रेल्वे उड्डाण पूल,पेल्हार, नालासोपारा फाटा, चिंचोटी यासह अन्य ठिकाणी काँक्रिटिकरणावर खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथून ये जा करताना मोठ्या अडचणी येत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे आणखीन रस्त्यांची अवस्था बिकट बनू लागली आहे. या खड्ड्यांचा मोठा फटका दुचाकी स्वारांना बसण्याची शक्यता आहे. रस्ता खराब असल्याने दुचाकी चालविताना अनेकदा वाहनांचे नियंत्रण बिघडते त्यामुळे पडून अपघात होऊ शकते असे दुचाकीस्वारांनी सांगितले आहे.
काँक्रिटिकरणाचे काम सुरवातीपासून निकृष्ट राहिले आहे त्याचा हा परिणाम आहे. महामार्गाचा रस्ता जास्त काळ टिकला पाहिजे याच उद्देशाने काँक्रिटीकरण करण्यात आले होते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महामार्गाची स्थिती फारच बिकट असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
महामार्गावर पाणी साचण्याची समस्या कायम
महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गावरील मालजीपाडा, किनारा हॉटेल, ससूनवघर जवळील जेके टायर समोर, वसई फाटा, सन शाईन हॉटेल समोर, नालासोपारा फाटा,यासह विविध ठिकाणच्या भागात पाणी तुंबते आणि वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे.
२० हजार ठिकाणी पॅनल दुरुस्तीचे काम
महामार्ग प्राधिकरणानेज्या भागात रस्ता खराब झाला आहे. त्यात रस्त्यावरील पॅनल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जिथे काँक्रिटिकरण अधिकच खराब झाले आहे त्यांची तपासणी करून त्याठिकाणचा पॅनल काढून पुन्हा दुरुस्ती केली जात आहे असे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. १२१ किलोमीटरच्या हद्दीत साधारणपणे २० हजार ठिकाणी पॅनल दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. असेही चिटणीस यांनी सांगितले आहे.