वसई: वसई विरार महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून शहरात बेकायदेशीरपणे उभारलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई सुरू केली आहे. आठवडा भरातच बेकायदेशीर जाहिरात फलक लावणाऱ्या ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

वसई विरार शहरात नियमबाह्य पध्दतीने जाहिरात फलक लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. असे असतानाही शहरात विविध ठिकाणी अनधिकृत व धोकादायक पद्धतीने जाहिरात फलक उभे केले जात आहेत. मुख्य रस्ते, वळणाचे रस्ते आणि चौकात जाहिरात फलक लावताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. नुकताच झालेल्या गणेशोत्सवात आणि नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात शुभेच्छांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला ही अडथळे निर्माण झाले होते.

बेकायदेशीर जाहिराती फलकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा पालिकेच्या जाहिरात विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बेकायदेशीर जाहिरात फलक उभारणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. नुकताच पालिकेने पेल्हार, वसई होळी मार्केट, वसई बस आगार, पाणजू स्टॉप, नायगाव कोळीवाडा, पापडी मार्केट, नालासोपारा, यासह अन्य भागातील ९ जणांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे महापालिकेचे उपायुक्त (जाहिरात विभाग) अजित मुठे यांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा ३१ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत एकूण ४० जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पालिकेने सांगितले आहे.

धोकादायक जाहिरात फलकांवर कारवाई सुरूच

शहरात असलेल्या बेकायदा तसेच धोकादायक असलेल्या जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली आहे. धोकादायक अवस्थेतील फलक, नवरात्री व गणेशोत्सवात बेकायदेशीर लावलेले फलक, वाढदिवस शुभेच्छा फलक, कमानी, वीज रोहित्रा जवळ असलेले व वाहतुकीला अडसर ठरणाऱ्या जाहिरात फलकांच्या विरोधात कारवाई सुरूच आहे. १ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर या दरम्यान ३ हजार २३९ फलक व १५६ कमानी काढण्यात आल्या आहेत. ही कारवाई आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिरात विभागाच्या पथकाने केली आहे.