वसई : यंदा मान्सून परतल्यानंतरही सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा वसई विरार शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. महाकालिकेने ऐन दिवाळीत काही रस्त्यांवर डागडुजी केली असली, तरी अवकाळी पावसामुळे हे पॅचवर्क उखडले असून, पुन्हा खड्ड्यांची समस्या उद्भवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि वर्दळीचे चौक या सर्वच ठिकाणी मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर काही भागात याच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, संथगतीने वाहतूक अशा समस्या उद्भवल्या आहेत.

वसई विरार शहरातील अर्नाळा-गिरीज रस्ता, नायगाव-पापडी रस्ता, गोखिवरे, चिंचोटी, माणिकपूर, सनसिटी-गास रस्ता, नालासोपारा अशा मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे पुन्हा एकदा खोल खड्डे पडू लागले आहेत. दुचाकी आणि रिक्षाचालकांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डागडुजीचा प्रयत्न निष्फळ

शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून ऑक्टोबर महिन्यात शहरातील काही भागात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे महापालिकेकडून करण्यात आलेले तात्पुरते डागडुजीचे काम अवघ्या काही दिवसांतच वाहून गेले आहे.

खड्ड्यांमुळे अपघाताच्या धोक्यात वाढ

सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचू लागले आहे. ज्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांची खोली आणि आकार अंदाजता येत नाही. तर दुसरीकडे रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर, वाहनाचे चाक खड्ड्यात अडकून वाहनचालकांचा अपघात होण्याच्या शक्यताही वाढली आहे.

रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने ठेकेदारांना नोटिसा

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेतर्फे करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत पूर्ण देखील करण्यात आली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या पॅनलवरील १३ ठेकेदारांना नोटीस बजावून त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.