मागील काही महिन्यांपासून वसई विरार शहरातील सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना ही समोर येत आहेत तर दुसरीकडे धूळ प्रदूषणाने ही जनतेची कोंडी होऊ लागली आहे. अशी स्थिती असतानाही रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून प्राधान्य का दिले जात नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.
पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. मागील काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत असलेल्या वसई विरार शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, संपूर्ण शहर खड्डेमय झाले आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे,’ अशीच शहरातील रस्त्यांची अवस्था आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार होते. याचा वाहनचालकांना मोठा फटका बसतो. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तर काही वेळा अपघातासारख्या घटना घडतात. चिंचोटी कामण रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की एक दिवसाआड अवजड मालवाहतूक वाहने रस्त्यावरच उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांच्या जाचाला कंटाळून येथील उद्योग ही हळूहळू स्थलांतरणाच्या मार्गावर आहेत.
मागील काही वर्षाच्या तुलनेत वसई विरार शहरातील विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी पालिकेकडून २० ते २५ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. पाऊस पडत असल्याचे कारण पुढे करत रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने आजही खड्ड्यांची समस्या कायम आहे. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी पालिकेकडून खड्डे दुरूस्त केले जातात. मात्र गणेशोत्सव सरला त्यापाठोपाठ नवरात्री उत्सव ही संपला आता दिवाळी तोंडावर आली तरी सुद्धा रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अगदी जीव मुठीत घेऊन वाहनचालक खड्डेयुक्त रस्त्यांवरून गाडी चालवत असतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत काही वेळा जीवितहानी सुद्धा झालेली आहे. महापालिका रस्त्यांच्या कामासाठी मोठा प्रमाणावर निधी खर्च केला जातो. रस्ताबांधणी आणि दुरुस्तीसाठीही कोट्यवधींचा खर्च केला जातो. मग प्रश्न पडतो, की इतका पैसा खर्च करूनही रस्त्यावरील खड्डे कायमचे नाहीसे का होत नाहीत? शहर खड्डेमुक्त का होत नाही? महापालिकेकडून खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. मात्र तेच दावे फोल ठरताना दिसून येत आहे. खड्डे समस्यांबाबत यावर्षी वसईतील काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मनसे, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती अशा राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना ही आक्रमक झाले होते. मात्र पालिकेकडून केवळ आश्वासन देण्यात आले प्रत्यक्षात कृतीच दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
निविदांचा खेळ…..
वसई विरार शहरातील रस्ते खड्डे मुक्त व्हावे यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला आहे. यात अतिखड्ड्यांच्या ठिकाणचे रस्ते, मुख्य रस्ते अशा रस्त्यांचा समावेश आहे. यासाठी पालिकेकडून कोट्यावधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात. नुकताच पालिकेने प्रमुख आठ रस्ते आणि अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे १२३ कोटींच्या दोन निविदा काढल्या आहेत. मात्र त्यानंतर त्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय होत आहे. ठेकेदारांच्या नफ्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या कररुपी पैश्यांचा अक्षरशः चुराडा केला जात असल्याचे सातत्याने नागरिक सांगत असतात.
रस्ते दुरुस्तीचा खर्च पाण्यात
पालिकेकडून सातत्याने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जात आहे. मात्र ठेकेदाराकडून करण्यात येणारी दुरुस्ती ही निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील खड्डे काही प्रमाणात बुजवण्यात आले होते. मात्र ही रस्ते दुरुस्ती महिनाभरही तग धरू शकली नाही. पावसानंतर थोड्याच दिवसात या खड्ड्यांतील खडी आणि डांबर वाहून गेल्याने दुरुस्तीचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला. यामुळे रस्त्यांवरील खड्डयांच्या स्थितीत काहीच बदल झाला झाला नाही. पॅचवर्कच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली केवळ निकृष्ट दर्जाची डागडुजी करून नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्यांचे खोदकाम आणि निकृष्ट दुरुस्ती
वसई विरार शहराला मागील वर्षी पासून सूर्या पाणीपुरवठा योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. या पाणी वितरणासाठी शहरातील रस्त्यावर व रस्त्यालगत जलवाहिन्या अंथरण्यात आल्या आहे. त्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले होते. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणचे रस्ते पूर्ववत करणे गरजेचे होते. मात्र अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे समोर आले आहे. याच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे विरार पूर्वेला खड्ड्यात पडून प्रताप नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुणवत्ता तपासणी कडे दुर्लक्ष
रस्त्यांची कामे होतात व कोट्यावधी रुपयांची देयके सुद्धा मंजूर केली जातात. मात्र रस्त्यांचे करण्यात येत असलेले काम योग्य रित्या झाले आहे किंवा नाही याची गुणवत्ता तपासणी केली जात नाही. गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटी संस्थेची मदत घेतली जाईल असेही पालिकेकडून सांगण्यात आले होते मात्र त्यावरही अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच रस्त्यांवरील खड्डयांबाबत संबंधित रस्त्यांच्या ठेकेदारावर कारवाई होऊन त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायला हवे. तसेच त्या ठेकेदाराला गुणवत्तापूर्ण काम केल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई व्हायला हवी तरच हळूहळू शहर खड्डे मुक्त होणे शक्य होणार आहे.
धूळ प्रदूषणाने कोंडी
पाऊस थांबताच वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांतील कोरड्या चिखलामुळे निर्माण झालेल्या धुळीच्या त्रासाने शहरभर अक्षरशः धुरकट वातावरण तयार झाले आहे. खड्ड्यातील व रस्त्यावर साचलेला चिखल आता सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या चिखलाचे रूपांतर आता धुळीत होऊ लागले आहे. हीच धूळ आता हवेद्वारे सर्वत्र पसरू लागली आहे. त्याचा त्रास रस्त्यावरून ये जा करणारे दुचाकीस्वार, रिक्षा चालक, पादचारी नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे.याशिवाय रस्त्यालगत असलेले दुकानदारही धुळीने त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे श्वसनाचे आजार, सर्दी, खोकला अशा आजारांचा धोका वाढला आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे धुळप्रदूषण यामुळे वसई विरारकरांची दुहेरी कोंडी झाली आहे.