वसई : वसई विरार शहरात पालिकेकडून विविध ठिकाणी नुकताच खड्डे बुजवून रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट केल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. यामुळे आता या कामाची भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) मदतीने गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे.
पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले होते. अशा धोकादायक खड्ड्यातून नागरिकांना ये जा करावी लागत असल्याने खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी पासूनच पालिकेने शहरात रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार अनेक भागात खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी ठेकेदाराकडून दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची केली जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत.
याबाबत दैनिक लोकसत्ताने ‘रस्ते दुरुस्तीचा दावा फोल’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करून शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था निदर्शनास आणून दिली होती.
याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनोजकुमार पवार यांनी रस्ते दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. ज्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे.त्याची भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) मदतीने गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. तसे पत्र ही या संस्थेला पाठविले जाणार आहे. या संस्थेकडून जेव्हा रस्ते दुरुस्तीचा अहवाल मिळेल तेव्हाच ठेकेदारांना त्याची देयके दिली जातील असे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.