वसई: वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. या वाढत्या नागरिकरणासोबतच या ठिकाणी वाहनांची संख्या ही वाढली आहे. तर दुसरीकडे बेशिस्त वाहनचालक व रस्त्याच्या कडेला बस्तान मांडून बसणारे फेरीवाले यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र बनू लागली आहे.
राष्ट्रीय महामार्ग, शहरांतर्गत जोडणारे रस्ते, उड्डाणपूल अशा सर्वच मार्गांवर नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासनतास अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे या भीषण वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी वाहतूक विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरार वाहतूक शाखेने शहरातील अतिगर्दी व वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. यात काही रस्त्यांच्या ठिकाणी एक दिशा मार्गिका तयार करणे गरजेचे असल्याने तसा आराखडा तयार करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे महापालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता व मजेठिया नाका ते टोटाळे तलाव वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३१ ऑक्टोबर पासून एक दिशा मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेत घेण्यात आला आहे. पूर्वी दोन्ही मार्गावर वाहनांची गर्दी आणि फेरीवाले यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. मात्र एक दिशा मार्गिका धोरण लागू केल्यानंतर त्याठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करून याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच महापालिकेच्या मदतीने त्या ठिकाणी बसणारे अनधिकृत फेरीवाले ही हटविण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
विरार आणि मजेठीया येथील रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या होती. त्या आता दोन्ही रस्ते एक दिशा मार्गिका तयार करून त्या ठिकाणचे फेरीवाले, रस्त्याच्या मध्येच उभी केलेल्या वाहनांवर कारवाई करून हटविले आहेत. त्यामुळे आता येथील कोंडीची समस्या कमी झाली आहे. शहरातील अन्य भागातही कोंडी नियंत्रणात राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – महेश शेट्ये, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक विरार विभाग
विरारमधील अंतर्गत वाहतुकीतील बदल
प्रवेश बंद मार्ग:
- वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे (महानगरपालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता)
- मजेठिया नाका ते टोटाळे तलाव (वाचनालयाकडे जाणारा मार्ग)
पर्यायी मार्ग:
- मजेठिया नाका व सबवे नाका येथून येणारी वाहने मच्छी मार्केट – बी.के. वर्तक चौकमार्गे बाहेर पडतील.
- टोटाळे तलाव वाचनालय येथून मजेठिया नाका (बस स्टँड समोरून) मार्गे वाहने बाहेर पडतील.
