वसई:- दहिसर पथकर नाका वर्सोवा व वसई विरार भागात स्थलांतरित   होणार नाही अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने मांडलेला पथकर नाक्याचा प्रस्ताव कात्रीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दहिसर पथकर नाका मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र हा पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या जागेवरून मोठा वाद उभा राहिला आहे.यापूर्वी हा पथकर नाका वर्सोवा येथील नर्सरी जवळ स्थलांतरित केला जाणार रस्त्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.मात्र यामुळे वन विभागाची जागा बाधित होत असल्यामुळे यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप नोंदवला होता.तर यामुळे आसपासच्या गावावर मोठा प्रभाव पडणार असल्याने घोडबंदर गावासह भूमिपुत्र संघटनेने याला विरोध केला आहे.  हा तिढा सुटावा यासाठी नुकताच प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर पुन्हा एकदा भूमिपुत्र संघटना आक्रमक होत त्यांनी तातडीने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. वर्सोवा येथील दोन्ही बाजूची जागा ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आहे. त्यामुळे तेथील एक इंच सुद्धा जागा देणार नसल्याची भूमिका नाईक यांनी मांडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई भागातही कोणत्याही परिस्थितीत हा पथकर नाका होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी भूमिपुत्र संघटनेला दिले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहिसर पथकर नाका स्थलांतरणाचा शिवसेना शिंदे व भाजप यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

जकात नाक्याची जागा विकासकांच्या फायद्यासाठी

दहिसर पथकर नाक्या जवळ सुरवातीला जकात नाका होता. त्याच जागेत पथकर नाक्याचा विस्तार झाला असता तर वाहतूक कोंडी सुटली असती. मात्र काही लोकांनी स्वतःच्या लाभासाठी तो भूखंड विकासकांना विकला असल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. जर ही जागा असती तर प्रश्न सुटला असता असेही त्यांनी सांगितले.

सरनाईकांची समजूत काढू- गणेश नाईक

प्रताप सरनाईक हे आमचे सहकारी आहेत. त्यांच्या मनात लोकांची सेवा करण्याची इच्छा असून त्यांचा कोंडी सोडविण्याचा प्रयत्न आहे. यावर मंत्रिमंडळ बैठकीत ही त्यांना म्हटलं की तुझी काय भूमिका असेल ती सांग आपण मार्ग काढू असे गणेश नाईक यांनी सांगितले आहे. परंतु वर्सोवा किंवा वसईत पथकर नाका होणार नाही हे खात्रीने सांगतो असेही नाईक म्हणाले.

जनआंदोलन उभारू 

वसई विरार शहरांच्या वेशीवर पथकर नाका उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. यावरून भूमिपुत्र संघटना आक्रमक झाली आहे.  मुंबईचा पथकर नाका आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला आहे. ही बाब पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर तोडगा निघाला नाही तर सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व गावकरी मिळून मोठं जनआंदोलन उभारू असा इशारा भूमिपुत्र संघटनेने दिला आहे.