संकरित बियाण्यामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी ते आरोग्यदृष्ट्या कितपत फलदायी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यातूनच सेंद्रिय बियाण्यांचा वापर करून उत्पादित धान्य आरोग्यदायी असल्याचे लक्षात आल्यानंतर देशभरात देशी वाणांच्या बियाण्यांची बँक (बीज बँक) सुरू करण्याची संकल्पना मांडली गेली आहे. शिरोळ तालुक्यातील अशाच एका बहरलेल्या बीज बँकेविषयी. संकरित बियाण्यामुळे उत्पादनात वाढ झाली असली तरी ते आरोग्यदृष्ट्या कितपत फलदायी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. ही मांडणी करणाऱ्या वर्गाकडून सेंद्रिय बियाणांचा वापर करून उत्पादित धान्य आरोग्यदायी असल्याचे आवर्जून सांगितले जाते. किंबहुना सेंद्रिय बियाणांचे हेच महत्त्व लक्षात आल्यानंतर देशभरात देशी वाणांच्या बियाणांची बँक (बीज बँक) सुरू करण्याची संकल्पना मांडली गेली आहे. पद्माश्री पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचा संग्रह केला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी ही पायवाट आणखी मोठी करण्याचे काम चालवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ या गावी नारीशक्तीने हे काम उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या टप्प्यावर नेले आहे. तेथील २५० महिलांनी एकत्र येऊन देशी वाणांच्या बियाणांची बँक तयार करून जुन्या गावठी पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केले आहे. याच्या जोडीलाच मूल्यवर्धिततेचा मार्ग चोखाळत त्यांनी देशी बियाणांच्या उत्पादित धान्यांपासून विविध प्रकारचे खाद्यापदार्थ बनवले आहेत. त्याची मागणीही वाढत चांगली आहे. एकूणच शिरोळच्या मातीमध्ये देशी बियाणाच्या बँकेचे रोपटे आता चांगलेच बहरले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुका म्हणजे शिरोळ. सिंचनाची सुविधा उत्तरोत्तर वाढत गेल्याने पहावे तिकडे उसाचे मळेच मळे. मधूनच भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा वेगळा वर्गही या भूमीत आहे. मधल्या काळामध्ये फूल शेतीचे प्रयोगही याच भूमी फुलले होते. प्रयोगशील शेतकऱ्यांची भूमी म्हणून शिरोळचा उल्लेख केला जातो. अशा या तालुक्यात शेतीमधील एका वेगळ्या प्रयोगाची सुरुवात झाली आहे; ती म्हणजे देशी बीज बँकेची. त्याचा प्रवास असाच वेधक ठरणारा आहे. महत्त्व कोणते? देशी वाणांच्या बिया साठवण्याची अनेक कारणे आहेत. रोग प्रतिकारकता, दुष्काळ सहन करण्याची क्षमता, पौष्टिक गुणवत्ता, चव इत्यादी बाबतीत त्यांचे महत्त्व आहे. जैवविविधता पूर्वस्थितीत जतन करण्याच्या प्रयत्नात दुर्मीळ किंवा संकटग्रस्त वनस्पती प्रजातींमधील अनुवांशिक विविधतेचे नुकसान टाळता येते. बियाणे बँका त्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्याचे जतन करण्याचा मार्ग देतात. अनुवांशिक संसाधनांच्या नुकसानापासून संरक्षण केले जाते. बियाणे बँकांचे कार्य अनेकदा दशके आणि शतकेही चालते, असे अभ्यासक म्हणतात. असे झाले बीजारोपण शेडशाळ या गावातील पतसंस्थेच्या एका कार्यक्रमासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतीमध्ये रमणारा, वेगळे प्रयोग करणारा कारखान्याचा अध्यक्ष अशी पाटील यांची ओळख आहे. त्यांच्यापर्यंतही देशी बँकेच्या प्रचार प्रसाराचे लोन पोहोचले होते. तिथे उपस्थित महिलांचा मोठा वर्ग पाहून पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राहीबाईंनी देशी वाणांच्या बियाण्यांच्या जपणुकीबद्दल केलेल्या कार्याची माहिती दिली आणि याच मार्गाने पुढे जाऊन काही या क्षेत्रात नवे करता आले तर पहावे, असे त्यांना सुचित केले. इतके बोलून ते थांबले नाही तर त्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा पुरवण्याची तयारीही दर्शवली. या उपक्रमावेळी गावातील गोकुळ महिला बचत गटाच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. त्यांनी लगेचच या कामाला सुरुवात करायचे ठरवले. पहिल्याच टप्प्यात सव्वाशेहून अधिक महिला अनोख्या - अनोळखी वाटेने जाण्यासाठी तत्पर झाल्या. गावातील शेतकरी समूह संस्थेचे निजाम पटेल व सहकाऱ्यांनीही लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला. दत्त कारखान्याच्या वतीने या महिलांना बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्याकडे पाठवले गेले. या महिला शिंगणापूर परिसरात पोहोचल्या आणि राहीबाईंनी त्यांना कळवले, करोना संसर्गामुळे गाव बंदी केले आहे. तुम्ही येऊ नका. कामाला सुरुवात केली आणि पहिल्याच टप्प्यात असे नाऊमेद होण्याची वेळ आली. पण त्यामुळे या महिला खचल्या नाहीत. त्यांनी उमेदीने काम करण्याचे ठरवले. तोवर इकडे गणपतराव पाटील यांनीही आपले प्रयत्न जारी ठेवले होते. देशी वाणाचे बियाणे कोठे उपलब्ध होतात याची माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली. सातारा, वाळवा येथे या बियाणांची उपलब्धता झाली. हे बियाणे त्यांनी गोकुळ बचत गटाच्या महिलांकडे सोपवले. खऱ्या अर्थाने बीज बँकेचे बीजारोपण झाले. अनवट पायवाट महिलांनी या कामाला प्रारंभ केला खरा, पण गावगाड्यात राहूनही शेती अशी कसतात हेच बहुतांशी महिलांना मुदलात माहीत नव्हते. तरीही काहीतरी करायचे या निर्धाराने बायांनी पुढचे पाऊल टाकायचे ठरवले. त्यांना गावालगत रस्त्याकडे असलेली तीन गुंठा जागा देशी वाणांची बीज बँक तयार करण्यासाठी दिली. हाती कधी कोयता- खुरपे न घेतलेल्या या महिलांनी समरसून कामाला सुरुवात केली. उन्हातान्हात काम केल्याने काहींना आजारपणाने गाठले. अनवट पायवाटेने जाताना खचून मात्र कोणीच गेले नाही. त्यांनी काम सुरूच ठेवले. सुरुवातीला असे ठरले होते की जितके बियाणे घेतले आहे; ते पिकले की त्याहून दुप्पट बियाणे घरी न्यायचे. अशी प्रोत्साहन पर संधी दिली असतानाही या नारीशक्तीचा निर्धार असा की त्यांनी आजतागायत बियाणाचा एक कणही घरी नेलेला नाही. शिवाय, घराच्या परसबागेत या गटातील शेकडो महिलांनी यापासून उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. बाजारात सकाळी खरेदी केलेली भाजी संध्याकाळी मान टाकते असा अनुभव. पण येथे पिकणाऱ्या भाज्या आठवडाभर ताज्यातवाण्या राहतात आणि त्याचा सुगंध दरवळ राहतो. शाबासकीची थापदेशी वाणांचे उत्पादन कसे घ्यायचे यासाठी राज्याच्या कृषी विभागाने एक संरचना केलेली आहे. त्याचे आकलन होण्यासाठी शासनाने एक उपक्रमही आखला आहे. त्यामुळे या महिलांनी उत्पादित केलेल्या या शेतीला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली सतत येत असतात. खेरीज राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी यांच्याही भेटी सतत होत असतात. राहीबाई या दत्त कारखान्यावर आल्या तेव्हा त्यांनी गणपतराव पाटील आणि या महिलांशी संवाद साधला. देशी वाणांच्या बियांची जपणूक करण्यासाठी मला तपाहून अधिक काळ घालवावा लागला. हेच कार्य शेडशाळाच्या जिद्दी महिलांनी अल्पकाळात केले आहे. हे पाहून खचितच आनंद वाटतो, असे कौतुक करीत त्यांनी महिलांची पाठ थोपटली. त्यांचा उत्साह आणखीनच दुणावला. राहीबाईंकडून या महिलांनी प्रशिक्षणही घेतले. पहिली सहकारी बीज बँक पण हे काम केवळ प्रचलित चौकटीबद्ध न करता त्याला व्यापक आयाम मिळाला पाहिजे या दिशेने पावले टाकण्याचे ठरवले. त्यातूनच डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या देशी बीज बँकेची स्थापना करण्यात आली. देशी बियाणांची ही पहिली वहिली बँक. बँकेला सहकार विभागाकडून नोंदणी पत्र मिळाले. त्यानंतर या महिलांनी आणखी पुढचे काम करण्याचे ठरवले. आता जवळपास चार एकरांमध्ये या महिला ४० प्रकारच्या देशी बियाणांचे उत्पादन घेत असतात. खेरीज दोन-चार गुंठ्यात असे पीक घेणाऱ्या दोनशेवर महिला आहेत. कोणी घरी परसदारात, टेरेसवर असे उत्पादन घ्यायचे ठरवले तर त्यांना देशी बियाणे पुरवले जाते. त्यासाठी देशी बियाणांचे नीटसे पॅकिंग करण्यास या महिला शिकल्या आहेत. १०,२०, ५० ग्रॅमच्या स्वरूपात बियाणे विक्रीसाठी ठेवले जाते. बियाणे टिकवून ठेवण्यासाठी ते गाईच्या राखेत ठेवले जात असल्याने त्याला साधी अळीही लागत नाही, असा या महिलांचा अनुभव आहे. या महिला भाजी, फळे, कडधान्य अशा स्वरूपातील देशी बियाणांचे उत्पादन घेत असतात. संस्थेच्या अध्यक्षा शमशाद इब्राहिम पठाण, उपाध्यक्ष शैला सुभाष चौगुले, सचिव वैशाली किरण संकपाळ, रूपाली सुरेश मेंगे, अक्काताई संजय मगदूम यांच्यासह अन्य महिला या कार्यात सक्रिय असतात. मूल्यवर्धित पदार्थ केवळ देशी वाणांचे पीक न घेता उत्पादित धान्यापासून मूल्यवर्धित पदार्थ करून विकायचे ठरवले. गाजर - माईन मुळापासून लोणचे, पांढऱ्या चवळीचे सांडगे, पालेभाज्यांपासून चुलीवर पराठा असे अनेक पदार्थ तयार केले जातात. ही देशी वाणांची ही शेती पाहण्यासाठी येणारा वर्ग याची झपाट्याने खरेदी करत असतो. सा. रे. पाटील पुण्यतिथीदिनी या वस्तूंचे प्रदर्शन केले जाते तेव्हा त्याची हातोहात विक्री होत असते. अशा प्रकारे या समूहाने हेच कार्य आणखी पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग कसे करता येईल याचे नियोजन चालवले आहे. dayanandlipare@gmail. com