करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्याभरापासून ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जनतेशी वेळोवेळी संवाद साधला. लोकांनी धैर्याने सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करावा असे आवाहन त्यांनी समाजमाध्यमावरच्या या व्यासपीठावरून केले. त्या संवादातील हा संपादित अंश..
जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची ही वेळ आहे. त्यामुळे लोकांनी आणखी पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये. तसेच गर्दीची ठिकाणे टाळावीत. जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यातून जगणे अवघड झालेल्या जनतेची मी माफी मागतो. पण हे लक्षात घ्या, सायरन वाजला आहे, पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वानी खूप काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही यंत्रणांना सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम राहिले, तर आपण सर्व मिळून करोनावर नक्कीच मात करू शकतो.
आपली करोनासोबतची लढाई सुरूच आहे, आधी विषमतेसोबत होती आता विषाणूसोबत आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो.
मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग प्रतिबंधित केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापाऊलका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरून रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत रुग्णांची संख्या फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे.
या संकटकाळात आधीच चिंतेचे आणि तणावाचे वातावरण असताना काही समाजकंटकांचा व्हायरससुद्धा पसरत आहे, खोटय़ा आणि चिथावणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून काही मंडळी समाजात दुही निर्माण करू पाहत आहे. मात्र महाराष्ट्राची जनता, राजकीय मंडळी कोणताही भेदभाव न करता एकत्र सरकारच्या पाठीशी उभी आहे. या समाजघातक संकटाला उलथवून लावून महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करण्यासाठी काहीही करायला मी मागेपुढे पाहणार नाही.
रेल्वेमधील गर्दी कमी व्हावी यासाठी आम्ही सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आम्ही सुरुवातीला ५० टक्क्य़ांवरून २५ टक्क्य़ांवर आणली. याशिवाय एक असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता मुंबई (एमएमआरडीए रिजन), पुणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवड या भागातील सर्व खासगी कार्यालये आणि दुकाने आम्ही बंद केली. पण देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. तेव्हा आणखी कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागले. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. रेल्वे आणि बसमधील गर्दी न ओसरल्यामुळे आम्ही या जीवनवाहिन्या बंद करण्याचा निर्णय घेतला.
देशांतर्गत विमान वाहतूक थांबविण्यासाठी मी प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले. आणखी एक पाऊल उचलण्यात आले, ते म्हणजे महाराष्ट्राच्या सीमा आपण बंद केल्या. त्यानंतर जिल्ह्य़ांच्या सीमाही बंद करण्यात आल्या. ज्या जिल्ह्य़ांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे हा विषाणू पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश होता.
आरोग्य व्यवस्थेला कोणत्याही अवघड परिस्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय महाराष्ट्रात राजकीय, धार्मिक, क्रीडासंबंधी किंवा कोणताही उत्सव पार पडण्याची परवानगी नाकारण्यात आली. अनेक सण आणि उत्सव लोकांनी घरातच साजरे केले, त्याबद्दल त्यांचे आभार.
घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमेही काय करावे आणि काय करू नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. त्याचे कौतुकच आहे. पण त्यांनी अधिकृत सूत्रांद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग करावा अशी अपेक्षा आहे.
करोनाची लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. हे काय करणार तर उपचारांची गाईडलाईन ठरवणार आहेत. यामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरू केले आहे. मुंबईत हजारो चाचण्या झाल्या. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशी आपण रुग्णालयांची विभागणी करत आहोत.
हे पक्के ध्यानात ठेवा, करोना आपली परीक्षा बघतोय, पण हा एक छोटासा जीव आपले काहीही बिघडवू शकत नाही, आत्मविश्वास, धैर्य, संयम बाळगा. हा संयमाचा खेळ आहे ज्याने संयम गमावला त्याचा खेळ संपला.
हे पक्के लक्षात ठेवा..
१. करोना विरुद्धची लढाई आपण जिंकणारच आहोत. पण त्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक युद्ध लढायचे आहे. ते एक मोठे जागतिक युद्ध असू शकते. त्यासाठी आपण शारीरिक, मानसिकदृष्टय़ा खंबीर असले पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरील लढाईसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी घरी व्यायाम करा.
२. अनेक ठिकाणी केवळ करोना विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, न्यूमोनियाची लक्षणे असतील तर सर्वसामान्य रुग्णालयांमध्ये मध्ये जाऊ नका. त्याऐवजी कोव्हीड साठी तयार करण्यात आलेल्या चाचणी रुग्णालयात जा.
३. करोनाचा मुख्य हल्ला हा अन्य व्याधी असणाऱ्या ज्येष्ठांवर होतो. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या, हात धुवून मगच त्यांची सेवा करा.
४. मी करोनाशी लढणाऱ्या दोन योद्धय़ांशी बोललो. त्यातील पहिले म्हणजे आजारावर मात केलेल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या आईशी आणि करोनाच्या दाढेतून बचावलेल्या ८३ वर्षांच्या आजींशी. आपल्यात हिंमत असेल, जिद्द असेल तर सर्वकाही शक्य आहे,. कुणालाही करोनाची लागण झाली म्हणजे सगळे काही संपले असे होत नाही.
ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वयंशिस्तीने वागण्याची आहे. ही बंधने काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दूध, बेकरी, कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूकही सुरूराहणार आहे.
घरी असताना लोक वेगवेगळया समस्यांचा सामना करतायत, लोक कंटाळले आहेत हे मी समजू शकतो.पण या विषाणूला पराभूत करण्यासाठी घरी थांबण्यावाचून पर्याय नाही. करोना व्हायरसचा जिथून प्रसार झाला ते वुहान आता पूर्वपदावर येत असल्याचे मला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजले आहे. तिथे निर्बंध उठवले आहेत ही चांगली गोष्ट आहे. वेळेबरोबर सर्वगोष्टी सुरळीत होतील असाच त्याचा अर्थ होतो.
अत्यावश्यक सेवेसाठीच खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल. संकट आहे, पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील.
आराध्या नावाच्या एका सात वर्षांच्या चिमुकलीने आपल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान दिले. ही फार कौतुकास्पद बाब आहे. जनतेची अशीच साथ राहिल्यास करोनाचा लढा आपण जिंकूच असा मला विश्वास आहे.