विजया जांगळे vijaya.jangle@expressindia.com
आपल्याला पोहायला आवडते, जमते हे तिला पक्के माहीत होते. म्हणूनच इंग्लिश खाडी पोहणारी ती आशियातील सर्वात लहान आणि जगातील दुसरी लहान जलतरणपटू ठरली. याशिवाय जिब्राल्टरची खाडी, मुंबई ते धरमतर आणि परत मुंबई, श्रीलंका आणि भारताला जोडणारा पाक स्ट्रेट, ऑस्ट्रेलियातील फिलिप बे ते मेलबर्न, न्यूझिलंडमधील कुक स्ट्रेट, दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलंड अशी अनेक मोठी अंतरे तिने पार केली. त्या वेळी समुद्रातल्या विषारी सापांची, शार्क माशांचीही पर्वा केली नाही. म्हणूनच ती ‘सागरकन्या’ ठरली. आज तिची स्वत:ची जलतरण प्रशिक्षण संस्था आहे आणि जलशुद्धीकरणाची उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीचा कार्यभारही ती समर्थपणे पेलत आहे. जलतरणाने आपल्याला जे दिले, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेली आजची दुर्गा आहे, जागतिक विक्रमवीर रूपाली रेपाळे-हिंगे..
मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींसंदर्भात शिक्षण, नोकरी, लग्न या चाकोरीपलीकडे विचारही केला जात नव्हता, तेव्हा रूपालीच्या वडिलांनी तिच्यात दडलेला जलतरणपटू ओळखला. नेमके काय करायचे आहे, यातून काय हाती लागणार हे ना तिला माहीत होते, ना तिच्या बाबांना, परंतु समोर आलेली एकही संधी त्यांनी दवडली नाही. आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक क्षमता पूर्णपणे पणाला लावल्या आणि एक-एक टप्पा पार करत रूपालीने अनेक विक्रम नोंदवले.
रेपाळे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती एखाद्या स्पर्धात्मक क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण देण्याएवढी भक्कम नव्हती. तरीही वडील रामदास रेपाळे यांनी रूपालीला लहान वयातच जलतरणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. १०व्या वर्षी तिने समुद्रात पाच किलोमीटर अंतर सहज पार केले आणि प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर रूपाली ज्या तरण तलावात सराव करत असे, तिथले काही जलतरणपटू धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पोहत पार करणार होते. तिनेही भाग घेतला. नोव्हेंबर १९९३ मध्ये अवघ्या ११व्या वर्षी ३८ किलोमीटरचा पल्ला पार केला. मोठे अंतर कापण्याची तिची क्षमता आणि वेग पाहून काही प्रशिक्षकांनी तिच्या बाबांना इंग्लिश खाडी पोहण्यासाठी नेण्याचा सल्ला दिला. रूपाली तेव्हा १२ वर्षांची होती. आणि वजन अवघे २८ किलो होते. नियमानुसार ते किमान ३९ किलो असणे आवश्यक होते आणि स्पर्धेला अवघे दोन महिने शिल्लक होते. भरपूर बटर खाऊन तिने वजन वाढवले. रूपाली ब्रिटनला पोहोचली खरी, पण हाडे गोठवणाऱ्या थंडीत पात्रता चाचणी देऊन पोहण्याची परवानगी मिळवणे हे मोठे आव्हान होते. दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर ती पात्र ठरली.
१५ ऑगस्ट १९९४ रोजी प्रत्यक्ष इंग्लिश खाडीत पोहताना अखेरच्या काही तासांमध्ये थंडीने संवेदनाच नाहीशा झाल्या असतानाही, तिने प्रयत्न सुरू ठेवले. ठरलेले अंतर पार केले. इंग्लिश खाडी पोहणारी ती आशियातील सर्वात लहान आणि जगातील दुसरी लहान जलतरणपटू ठरली. वडिलांचा आणि प्रशिक्षकांचा विश्वास तिने सार्थ ठरवला. ते दोन्ही विक्रम आजही तिच्या नावावर कायम आहेत. त्यानंतर दोनच महिन्यांत तिने जिब्राल्टर खाडी पार केली. ही खाडी पार करणारी ती त्या वर्षांतील जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरली. त्यानंतर रूपालीने मुंबई ते धरमतर आणि परत मुंबई, श्रीलंका आणि भारताला जोडणारा पाक स्ट्रेट, ऑस्ट्रेलियातील फिलिप बे ते मेलबर्न, न्यूझिलंडमधील कुक स्ट्रेट, दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलंड अशी अनेक मोठी अंतरे पार केली.
पाक स्ट्रेटमध्ये विषारी साप असल्यामुळे जलतरणपटू तिथे जाणे टाळतात. या सापांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात. असा धोका पत्करून तिथे पोहणारी ती जगातील पहिली स्त्री आहे. ऑस्ट्रेलियात तर ती शार्कचा संचार असलेल्या भागातून पोहत गेली. ही कामगिरी करणारी ती जगातील सर्वात लहान जलतरणपटू आणि पहिली भारतीय ठरली. तिथे लोखंडी पिंजऱ्यातून पोहावे लागते. पोहणाऱ्याच्या वेगाप्रमाणे तो पिंजरा पुढे-मागे होत राहतो. यात पिंजऱ्यावर आदळून तिच्या पायांची नखे उखडली गेली. मुंबई-धरमतर-मुंबई पार करताना तिला समुद्रातील मासा चावला. त्यामुळे मोठी जखम झाली होती. पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे असे तीन क्रीडाप्रकार एकत्र असलेल्या विविध ट्रायथलॉन स्पर्धामध्येही तिने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
जलतरणातील तिच्या कामगिरीची दखल घेत राज्य सरकारने तिला ‘सागरकन्या’ म्हणून, तर न्यूझिलंड सरकारने ‘डॉल्फिन क्वीन’ म्हणून गौरवले असून याव्यतिरिक्त नॅशनल युथ अवॉर्ड, अडव्हेंचर अवॉर्ड अशा विविध महत्त्वाच्या शासकीय पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे.
तिच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारे ‘जल आक्रमिले’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यातील तिच्या इंग्लिश खाडीवरच्या कामगिरीवर आधारित लेखाचा समावेश सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकात धडय़ाच्या स्वरूपात केला आहे.
आज ती प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. चार वर्षांपूर्वी ती राहात असलेल्या संकुलातील तरण तलावात २-३ मुलांना जलतरणाचे प्रशिक्षण देऊ लागली. आज तिच्या विद्यार्थीसंख्येने १००चा आकडा पार केला आहे. सहज म्हणून सुरू केलेल्या प्रशिक्षणवर्गाने ‘रूपाली रेपाळे स्विमिंग अॅकॅडमी’चे रूप घेतले आहे. ठाणे, डोंबिवलीतील अनेक जलतरणपटूंना ती प्रशिक्षण देते. तिच्या अॅकॅडमीचे विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर लक्षणीय कामगिरी करत आहेत. तिच्या एका विद्यार्थ्यांने डेन्मार्क आणि जर्मनीला जोडणारा समुद्र, तसेच जिब्राल्टरची खाडी पार केली आहे.
खेळाव्यतिरिक्त व्यवसायातही तिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ती ‘रूपाली इंडस्ट्रीज’ची संस्थापक संचालकआहे. पाण्याशी असलेले तिचे नाते या व्यवसायातही कायम आहे. ‘बीएआरसी’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित जलशुद्धीकरण यंत्रे आणि उपकरणे तिच्या कंपनीत तयार केली जातात. यात घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या उपकरणांचा समावेश आहे.
पाण्याशी जुळलेले नाते रूपालीने अशा रीतीने तिने कायम ठेवले आहे. सध्या तिने आपल्या अॅकॅडमीवर लक्ष केंद्रित केले आहे. आव्हानांचा सामना करत मिळवलेल्या अनुभवांतून नव्या पिढीतले जलतरणपटू घडवते आहे.
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा
सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स
पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)
टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा