रामोशी जमातीत जन्म झालेल्या त्यांनी सगळ्याच सुविधांपासून वंचित असण्याचे चटके खाल्ले होते. आपल्यासारख्या अनेकांना त्या दलदलीतून बाहेर काढण्याचा निर्धारच त्यांना पदवीधर करून गेला. त्यांच्या ‘निर्माण’ संस्थेमुळे आज तेथील १५ हजार मुलांना शिक्षण मिळत असून शाळागळती तर थांबलीच पण ४० बालविवाहही रोखले गेले. तसेच लहान मुलांचं भिक्षा मागणं बंद झालं. इतकंच नाही तर इंदापूरातील १५ गावांमधील जातपंचायती मोडीत निघाल्या. हे सारं प्रयत्नपूर्वक करणाऱ्या धाडसी वैशाली भांडवलकर आहेत आजच्या दुर्गा.

ब्रिटिश सरकारने ‘गुन्हेगार जमाती कायद्या’ने अनेक भटक्या जातींना कठोर नियमांच्या विळख्यात जखडले होते. एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस वास्तव्याची त्यांना मुभा नव्हती. पोलीस ठाण्यात कुटुंबाची लावावी लागणारी हजेरी आणि या हजेरीच्या नावाने त्यांची नेहमी होणारी मानहानी भयंकर होती. अशाच एका रामोशी जातीत त्यांचा जन्म झाला. परंतु त्यांनी तसं जगणं नाकारलं आणि पदवीधर होत शिक्षणाच्या जोरावर भटक्या विमुक्त जमातीतील अनेकांच्या आयुष्याला आकार दिला. गुन्हेगार जमात म्हणून लागलेला कलंक दूर केला.

पुण्याच्या येरवडा भागातील नागपूर चाळ येथे वैशाली यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रंगारी काम करायचे, तर आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. त्यांनीच वैशाली यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या कुटुंबातील पहिल्या पदवीधर झाल्या. ‘कर्वे समाजसेवी संस्थे’मधून सामाजिक कार्यातली ‘मास्टर इन सोशल वर्क’(एमएसडब्ल्यू) ही पदवी त्यांनी प्राप्त केली ती एका विशिष्ट ध्येयाला समोर ठेवूनच.

समाजातील उपेक्षित आणि भटक्या विमुक्त समाजातीतील स्त्रियांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी, या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून त्यांचे कार्य त्यांनी स्थापन केलेल्या ‘निर्माण’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाचे दार खुले व्हावे यासाठी ‘सावित्रीची शाळा’ हा प्रकल्प राबवला.

पुणे शहर, इंदापूर तालुका तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत १५ हजार मुलांना शिक्षणाचा लाभ मिळत असून शाळागळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. विशेष म्हणजे यामुळे बालविवाहाचे प्रमाणही कमी झाले आहे. समाजाला कलंक असलेल्या बालविवाह प्रथेला धक्का देत आतापर्यंत त्यांनी ४० बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. भटक्या विमुक्त जमातीतील बाराशेहून अधिक मुलांना त्यांनी नागरिकत्व पुरावे मिळवून दिले आहेत, तर जवळपास १ हजार तरुणांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.

अंगणवाडी कार्यक्रमात बालके, गर्भवती स्त्रिया, स्तन्यदा माता आणि किशोरवयीन मुलींची नोंदणी करून पोषण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंगणवाडीमध्ये सकस आहार मिळू लागल्याने मुलांचं भिक्षा मागणं बंद झालं आहे. येथे मुला-मुलींना हॉकी आणि फुटबॉलसह विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे वडार समाजातील एका मुलीने हरियाणा येथील कराटे स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

हॉकी प्रशिक्षणातून १७ वर्षांखालील गटातील सहा मुलांची ‘अस्मिता राष्ट्रीय हॉकी स्पर्धे’साठी निवड झाली. दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. कौटुंबिक सल्ला केंद्र, स्त्रियांना कायदेशीर मदत मिळवून देणं, तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, भटक्या-विमुक्तांना आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशनकार्ड मिळवून देण्यासारखी रचनात्मक कामे करीत असताना इंदापूर भागात १५ गावांमधील जातपंचायती मोडीत काढण्याचे धाडसी कामही त्यांनी केले आहे.

भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वैशाली यांनी या स्त्रियांचे गट तयार केले. प्रत्येक गटातील स्त्रियांना गोधडी शिवणं, दागिने बनवणं, तसेच पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अपारंपरिक व्यवसाय करण्यास पात्र असणाऱ्या समुदायातील १०५ स्त्रियांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यापैकी ७० स्त्रिया पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये वाहनचालकाचे काम करत असून, त्यांना दरमहा २० ते ३५ हजार रुपये पगार मिळत आहे.

२०१७ मध्ये ‘भटके विमुक्त एकल महिला परिषदे’चं आयोजन करून स्त्रीवादी चळवळीला एक व्यापक आयाम निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केलं. भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन आणि पाठपुरावा केल्यामुळे सरकारच्या महिला धोरणात स्थान नसलेल्या एका भटक्या जमातीतील स्त्रीला त्यांनी तिसऱ्या महिला धोरणात जागा मिळवून दिली. तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस एका ठिकाणी थांबायची मुभा नसलेल्या भटक्या विमुक्त समाजातील सुमारे १ हजार कुटुंबांना इंदापूर तालुक्यात घरकुल मिळवून दिलं.

एकल स्त्रियांचे प्रश्न आणि आवश्यक उपाययोजनांचा अहवाल ‘महिला धोरण मसुदा समिती’ला सादर केल्याने त्यांचा धोरणामध्ये समावेश झाला. २०० एकल स्त्रियांना रोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली असून, ३०० एकल स्त्रियांच्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. वैशाली यांनी इंदापूर तालुक्यामध्ये २०० कुटुंबांना परसबाग निर्मितीची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे १८० कुटुंबांनी परसबाग फुलवली असून, ११४ कुटुंबांना त्यांच्या उत्पन्नामध्ये १० टक्के वाढ झाल्याचे सांगितले.

समाजाच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करून त्यासाठी अविरत झटणाऱ्या समाजसेविका वैशाली भांडवलकर यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम. vidyadhar.kulkarni@expressindia.com