‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे दहावे वर्ष. सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न उराशी बाळगून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देणारा हा उपक्रम. त्याद्वारे विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवादरम्यान ओळख करून देण्यात येते. अशा संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारणाऱ्या या उपक्रमाद्वारे आतापर्यंत १०२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. या उपक्रमास यंदाही दानशूरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या दहा संस्थांची पुन्हा थोडक्यात ओळख..
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’अंतर्गत नर्मदा खोऱ्यात सुरू केलेल्या ‘जीवनशाळे’ने ग्रामीण भागातील आदिवासी, वंचित मुलांच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्योती प्रज्वलित केल्या आहेत. त्या तशाच तेवत राहाव्यात यासाठी त्यांना आर्थिक साहाय्याची गरज आहे.
समाजाच्या तळागाळातील, उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘जीवनशाळा’सारखे प्रयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा प्रयोगांना आर्थिक बळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे; जेणेकरून या मुलांचे शिक्षण अधिक सहज आणि सुकर होईल. ‘जीवनशाळे’ची सुरुवात झाली १९९२ मध्ये, नंदुरबारमधील चिमलखेडीपासून. आंदोलनातील कार्यकर्त्यांनीच शैक्षणिक तक्ते, फळे, खडू, पुस्तके आणली आणि ‘जीवनशाळा’ सुरू झाली. शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती, पण काही वर्षांतच ‘जीवनशाळे’ने हे चित्र पालटून टाकले. जीवनशाळांतील मुलांनी गेल्या २८ वर्षांत उत्तम शैक्षणिक प्रगती केली आहे. विशेष म्हणजे, क्रीडाक्षेत्रात या मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 01205010169271
(शाखा -दादर)
आयएफएससी कोड : COSB0000012
’धनादेश या नावाने काढा – नर्मदा नवनिर्माण अभियान ( Narmada Navnirman Abhiyan)
प्राज्ञपाठ शाळा
महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्षीदार असलेल्या प्राज्ञपाठ शाळेची शतकी वाटचाल सुरू आहे. वैदिक शिक्षणाबरोबरच पुरोगामित्वाचा वारसा तिने जपला. अनेक प्रज्ञावंतांचा परीसस्पर्श लाभलेली प्राज्ञपाठशाळा मंडळ हे एक व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्रच ठरले. हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याची गरज आहे.
प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या ग्रंथालयामध्ये अनेक दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह आहे. त्यात २० हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे धर्मकोशातील अनेक नोंदींच्या पूर्ततेसाठी मंडळाकडे १२ हजारांहून अधिक जुन्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. अनेक वेळा दुर्मीळ साहित्याचे जतन करण्यासाठी संस्थेची आर्थिक ओढाताण होते. समाजातील अनेकांचे सहकार्य मिळेल, या अपेक्षेने संस्थेचे कार्य सुरू आहे. प्राज्ञपाठशाळा मंडळ ही संस्था पूर्णपणे लोकाश्रयावर चालते. संस्थेस कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांनी संस्थेला आर्थिक बळकटी देण्याची गरज आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 0770501069331 (शाखा- सातारा)
आयएफएससी कोड : COSB0000077
’धनादेश या नावाने काढा- प्राज्ञपाठशाळा मंडळ ( PRAJNAPATHASHALA MANDAL)
करुणाश्रम
वर्ध्याजवळचे ‘करुणाश्रम’ हे भूतदयेचे आदर्श उदाहरण. भूचर, जलचर, उभयचर अशा सर्व प्राणिमात्रांना आणि पक्ष्यांना तेथे आश्रय दिला जातो. वर्ध्यापासून पाच किलोमीटरवरील पिपरी या गावात पाच एकरावर वसलेल्या करुणाश्रमात सध्या तीनशेहून अधिक असाहाय्य प्राणी सुरक्षित जीवन जगत आहेत.
देशभरात प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या ‘पीपल फॉर अॅनिमल्स’ या संस्थेच्या कार्याची प्रचीती करुणाश्रमातून येते. याच संघटनेचे आशीष गोस्वामी यांनी उपजत प्राणीप्रेमातून हे प्राणी आश्रयस्थान साकारले. पावणेदोनशे गायी-बैल, म्हशी, उंट, घोडे, बदक, मोर, ससे, कुत्रे, मांजरी, हरीण, माकड, सर्कशीतील पोपट अशा प्राण्यांचा सांभाळ करुणाश्रमात केला जातो. त्यासाठी दररोज दहा हजार रुपयांचा खर्च येतो. प्राण्यांमध्येही गंभीर आजार उद्भवतात, जखमी प्राण्यांवर मोठय़ा शस्त्रक्रिया कराव्या लागतात. पण तशी सोय उपलब्ध नसल्याने प्राणी दगावतात. त्यांना वाचवण्यासाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी संस्थेला दानशूरांच्या मदतीचा हात हवा आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 0370501054144 (शाखा- नागपूर)
आयएफएससी कोड : COSB0000037
’धनादेश या नावाने काढा – पीपल फॉर अॅनिमल्स, करुणाश्रम, वर्धा ( People for Animals, Karunashram, Wardha )
पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ
पाच दशके संगीत क्षेत्राची सेवा करणाऱ्या इचलकरंजी येथील गायनाचार्य पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळाने कार्याचा पैस आणखी विस्तारण्याचे ठरवले आहे. कालानुरूप काही सुविधा निर्माण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. हे कार्य साकारण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. संगीतविश्वाशी जोडलेल्यांना पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर हे नाव परिचित आहे. बुवांच्या स्मृती जागवण्यासाठी पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळाची स्थापना झाली. गेल्या पाच दशकांत देशभरातील बहुतेक विख्यात गायकांनी आपली सेवा संस्थेत सादर केलेली आहे. संस्थेचा वाढता व्याप लक्षात घेत संस्थेच्या वास्तुरचनेत बदल करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. यामध्ये अधिक रसिक सामावणारे सभागृह, संगीत अध्ययनासाठी जादा खोल्या, आधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, आसन व्यवस्था, विविध वाद्ये या साऱ्यांची गरज आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 1140501025133 (शाखा- इचलकरंजी)
आयएफएससी कोड : COSB0000114
’धनादेश या नावाने काढा – पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ ( Pandit Balkrishna Buva Sangit Sadhana Mandal)
सार्थक सेवा संघ
रस्त्यावरच्या मुलांमध्येही परिवर्तन होऊ शकते, हे सार्थक सेवा संस्थेने अधोरेखित केले आहे. अशा मुलांना शालेय शिक्षणाच्या जोडीला कौशल्य प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण देणे अतिशय उपयुक्त ठरत असल्याचेही संस्थेच्या कामातून सिद्ध झाले आहे. त्यासाठीच कौशल्य आणि क्रीडा प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था सार्थक संस्थेला उभी करायची आहे. मूळचे नगरचे असलेले आणि नगरच्या स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून तसेच इतरही उपक्रमांमधून अनेक वर्षे सामाजिक काम करणारे डॉ. अनिल कुडिया यांनी सार्थक सेवा संघ या संस्थेची स्थापना केली. संस्थेने रस्त्यावरच्या मुलांना उत्तम शिक्षणाची व्यवस्था वसतिगृहासह उपलब्ध करून दिली आहे. सासवडपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबळे या गावात संस्थेची दोन वसतिगृहे आहेत. ही वसतिगृहे समाजाने दिलेल्या मदतीतूनच उभी राहिली आहेत. मात्र, रंगकाम, फर्निचर, लोखंडी कपाटे, बंक बेड, टेबल अशा कितीतरी बाबींची अद्याप कमतरता असल्याने संस्थेला निधीची तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी साहित्याची गरज आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 90605010105453 (शाखा- हडपसर)
आयएफएससी कोड : COSB0000906
’धनादेश या नावाने काढा – सार्थक सेवा संघ, पुणे ( Sarthak Seva Sangh, Pune )
डोअरस्टेप स्कूल
मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून तीन दशकांपूर्वी ‘डोअरस्टेप स्कूल’ या संस्थेची स्थापना झाली. रजनी परांजपे आणि बीना शेठ लष्करी यांनी लावलेले हे रोपटे आता मोठय़ा वृक्षात रूपांतरित झाले आहे.
संस्थेचे मुंबईत १५० शाळा शिक्षक आणि वस्ती शिक्षक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १३५ वस्ती शिक्षक आणि ९२ शाळा शिक्षक आहेत. याशिवाय परीक्षक, शिक्षक प्रशिक्षक, समुपदेशक आदी कर्मचारीही संस्थेबरोबर काम करतात. टाळेबंदीमुळे त्यांना वेतन कोठून द्यायचे, असा प्रश्न संस्थेपुढे आहे. मुंबईत ३० ते ४० हजार आणि पुणे परिसरात ७० हजार विद्यार्थी संस्थेशी जोडलेले आहेत. यातील ५५ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी डिजिटल उपकरणे नाहीत. संस्था के वळ ५० टॅबची व्यवस्था करू शकली. डिजिटल शिक्षणाची सुविधा पुरविण्याबरोबरच एकही मूल शिक्षणासाठी वंचित राहू नये, यासाठी कार्यक्षेत्र वाढविण्याचा संस्थेचा मानस आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 0070501038614
(शाखा- औंध, सानेवाडी)
आयएफएससी कोड : COSB0000007
’धनादेश या नावाने काढा – ‘द सोसायटी फॉर डोअरस्टेप स्कू ल’
THE SOCIETY FOR DOORSTEP SCHOOL
वयम्
‘प्रश्न लोकांचे, शक्ती लोकांची आणि मार्ग चळवळीचा’ या सूत्राचा वापर करून गेल्या १२ वर्षांपासून आदिवासी पाडय़ांवर ‘वयम्’ संस्थेच्या चळवळीतून लोकशाहीचा जागर सुरू आहे. कायद्यांचा वापर करून, यंत्रणांशी संघर्ष करून मिळवलेले हक्क आणि त्यातून येणारी जबाबदारी निभावत हे आदिवासी पाडे विकेंद्रित विकासाचे प्रारूप बनण्याच्या वाटेवर आहेत. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी दानशूरांच्या मदतीची गरज आहे.
तरुणपणी काहीतरी वेगळे करण्याच्या ओढीने धडपडणारे मिलिंद थत्ते आणि दीपाली गोगटे या दोघांनी जव्हारमधील आदिवासी पाडय़ांवर २००८ च्या आसपास काम करायला सुरुवात केली. कोणतीही विचारधारा अथवा झेंडा खांद्यावर न घेता लोकशाहीने दिलेली ताकद पूर्ण क्षमतेने वापरणे हाच मूलभूत विचार त्यांनी मध्यवर्ती ठेवला. त्यामुळे ‘वयम्’ चळवळ या मातीत जन्माला आली, रुजली, फुलली. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी त्यास दानशूरांनी साथ द्यायला हवी.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 035100109942 (शाखा- नाशिक)
आयएफएससी कोड : COSB0000035
’ धनादेश या नावाने काढा – ‘वयम्’ Vayam
सोहम ट्रस्ट
भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्यातील भिक्षेकरी वृत्ती नष्ट करण्याचे आव्हान पुण्याच्या ‘सोहम ट्रस्ट’ने स्वीकारले आहे. भिक्षेकऱ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवून स्वावलंबी करण्याचे म्हणजे त्यांची वृत्ती बदलण्याचे हे ध्येयवादी काम आहे. डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनीषा हे ते समर्थपणे पार पाडत आहेत. शिवाजीनगर भागात त्यांचा छोटा दवाखाना आहे. आपल्या उत्पन्नातील ३० टक्के रक्कम ते भिक्षेकऱ्यांसाठी खर्च करतात. विविध व्यावसायिक गुण आणि कौशल्ये अंगी असूनही केवळ नोकरी नाही म्हणून भिक्षा मागणारे अनेक युवक आहेत. त्यांना योग्य वेळी काम मिळाले नाही तर नवे भिक्षेकरी, चोर- दरोडेखोर, अपहरणकत्रे, गुन्हेगार निर्माण होतील. त्यामुळे टाळेबंदीनंतर रस्त्यावरच ‘नोकरी महोत्सव’ भरवण्यात येणार आहे. संस्थेने आजपर्यंत ८५ भिक्षेकऱ्यांचे ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ असे परिवर्तन घडवले आहे. या परिवर्तनचक्राला गतिमान करण्यासाठी हातभाराची गरज आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 0900501024310 (शाखा- युनिव्हर्सिटी रोड)
आयएफएससी कोड : COSB0000090
’धनादेश या नावाने काढा –‘सोशल हेल्थ अँड मेडिसिन (सोहम) ट्रस्ट’ किंवा ‘सोहम ट्रस्ट’
SOCIAL HEALTH AND (SOHAM) MEDICINE TRUST
सुहित जीवन ट्रस्ट
बौद्धिक अक्षम मुलांकडे पाहण्याचा पालक आणि समाजाचा दृष्टिकोन बराचसा नकारात्मक असतो. अशा मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम पेणमधील ‘सुहित जीवन ट्रस्ट’ ही संस्था करते. समाजातील अन्य घटकांप्रमाणेच या मुलांना उत्पादक घटक बनवण्याचे आव्हानात्मक काम संस्था करीत आहे.
शहरांमध्ये बौद्धिक अक्षम मुलांसाठी अनेक शाळा असतात, पण ग्रामीण भागात मात्र त्यांची वानवा असते. ही बाब लक्षात घेऊन पेण येथे २००४मध्ये डॉ. सुरेखा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सुहित जीवन ट्रस्ट’ची स्थापना केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पेण तालुक्यातील गावागावांत जाऊन मुलांचे सर्वेक्षण केले. त्यातून मानसिकदृष्टय़ा अक्षम असलेली १७० मुले आढळली. या विशेष मुलांच्या शिक्षणाबाबत शासनस्तरावर अजूनही उदासीनता आहे. आजही सामाजिक संस्थांच्या मदतीने विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना शासनाचे पाठबळ मिळणेही आवश्यक आहे. विविध क्षेत्रांतील मंडळी एकत्र येऊन संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत आहेत. तेच संस्थेचे मुख्य संचित आहे. ही मुले काहीशी दुबळी असली तरी ती परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रोत्साहन देऊन लढ म्हणण्याची आवश्यकता आहे.
’धनादेश या नावाने काढा – सुहित जीवन ट्रस्ट (Suhit Jeevan Trust)
आरंभ
स्वमग्न मुलांचा सांभाळ करताना पालकत्वाची कसोटी लागते. अशा मुलांना सांभाळतानाच त्यांना स्वावलंबी बनवण्याचा वसा औरंगाबादच्या ‘आरंभ’ संस्थेने घेतला आहे. आतापर्यंत शेकडो मुलांना ‘आरंभ’ने जगण्याची नवी दिशा दाखवली आहे.
स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘आरंभ’ ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे. स्वमग्न मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा स्वत: पूर्ण करता याव्यात, समाजाने त्यांना सहजपणे स्वीकारावे यासाठी ही संस्था काम करते. स्वमग्नता हा आजार कोणत्याही औषधाने बरा होत नाही. या आजारासह जगणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एका दिव्यातून जावे लागते. ‘स्वमग्न मुलांवर उपचार करण्यासाठी होणारी फरपट अनुभवली आहे. अशी अनेक पालकांची स्थिती असेल असे जाणवल्यानंतर या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला’, असे शाळा सुरू करणाऱ्या अंबिका टाकळकर म्हणाल्या. दोन मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेतून आतापर्यंत ६०० मुले शिकली. सध्या ६७ मुले शिक्षण घेत आहेत. इमारत बांधणीसाठी संस्थेला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.
’ऑनलाइन देणगीसाठी खाते क्रमांक : 91205010109925 (शाखा- दशमेश नगर)
आयएफएससी कोड : COSB0000912
’धनादेश या नावाने काढा – आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची संस्था
Aarambh Society For Autism And Slow Learners Children
‘सर्वकार्येषु सर्वदा’मध्ये यंदा निवडल्या गेलेल्या संस्थांना ऑनलाइन स्वरूपातही देणगी पाठवता येईल. त्यासाठीचे तपशील (खाते क्रमांक, बँक शाखा, आयएफएससी कोड) संस्थांच्या अल्पपरिचयात दिले आहेत. ऑनलाइन स्वरूपात देणगी पाठविल्यानंतर देणगीदारांनी त्या ऑनलाइन व्यवहाराचे प्रतिमांकन (स्क्रीनशॉट) स्वत:च्या नाव व पत्त्यासह पुढील मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावेत :
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९८८१२१२९३३, विदर्भातील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९८१९०८१३१५, तर मुंबई महानगर प्रदेश व कोकणसह राज्याबाहेरील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९६६५२९२२११.
धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.
०१२०- २०६६५१५००