महेश सरलष्कर

जागतिक नेता बनण्यासाठी व्यापकतेची आवश्यकता असते, देशांतर्गत सुडाच्या राजकारणाची नव्हे, हे बाळकडू पं. नेहरूंनी अटलबिहारी वाजपेयींना दिले. वाजपेयींनीही ते अखेपर्यंत जपले. गेल्या चार महिन्यांतील ‘ईडी’करणाकडे पाहता, वाजपेयींच्या वारसदारांना त्यांच्या उमदेपणाचा विसर पडला असावा असे दिसते..

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते. तिथल्या भारतीयांनी त्यांना ह्य़ुस्टनला बोलावलेले होते. ‘हाउडी, मोदी!’ (कसे आहात मोदी?) असे अमेरिकेतील भारतीयांना विचारायचे होते. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बरोबर घेऊन अनिवासी भारतीयांना धन्यवाद दिले. तिथून ते न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक बैठकीला गेले. मग संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलले. मोदींनी पाकिस्तान वा काश्मीरचा उल्लेख केला नाही. ते दहशतवादाबद्दल बोलले. ते म्हणाले की, भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला.. मोदींचा अमेरिका दौरा राजकीय मुत्सद्देगिरी मानली गेली. मोदींचा हा आंतरराष्ट्रीय विजय ठरवला गेला आहे. भाजपसाठी मोदींची ही आणखी एक यशोगाथा आहे. शनिवारी मोदी भारतात परत आले.

कुठल्याही देशाचा पंतप्रधान मुत्सद्देगिरी करतच असतो. परदेशदौरेही होतात. पण मोदींची अमेरिकावारी खास मानली गेली आहे. ते भारतात आले म्हणून शनिवारी रात्री दिल्लीत स्वागतयात्रा काढली गेली. मोदी पालम विमानतळावर संध्याकाळी सातच्या सुमारास येणार होते. पत्रकारांना आगाऊ  कल्पना दिली गेली होती. सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून नेहमीप्रमाणे दोन तास आधी इच्छित स्थळी पोहोचायचे होते. मोदींच्या स्वागताची भाजपने जय्यत तयारी केलेली होती. मोदींच्या परतीचा हा मोठा ‘इव्हेंट’ होता. विमानतळाच्या अडीच किमीच्या अंतरात ‘मिनी भारत’ जमा झालेला होता. पंजाब, उत्तराखंड, बिहारचे कार्यकर्ते पारंपरिक पेहरावात आलेले होते. रस्त्याच्या दुतर्फा फुलांची सजावट होती. भाजपचे कार्यकर्ते, मोदींचे समर्थक तिरंगा आणि भगवा झेंडा घेऊन आलेले होते. पालम विमानतळाच्या बाहेर तयार केलेल्या व्यासपीठावर मोदींनी सगळ्यांना अभिवादन केले. त्या वेळी भाजपचा कार्यकर्ता घोषणा देत होता, ‘मोदी वन मॅन आर्मी..’, ‘त्यांची ताकद देशानेच नाही, तर जगाने मान्य केली आहे..’, ‘अमेरिकेत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या आपल्या पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले पाहिजे..’ वगैरे. मोदींच्या अमेरिकावारीकडे भाजप कसे पाहात आहे, हे समजावे यासाठी हे सगळे वर्णन!

महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुका महिनाभरात होणार आहेत. दोन्ही राज्यांमधील उमेदवार निश्चित झाले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती होणार हे जवळपास ठरलेले आहे. फक्त जागावाटप जाहीर होणे एवढीच बाब उरलेली आहे. सलग दोन दिवस भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दहा-दहा तास बसून तिकीटवाटपाचा अंतिम निर्णय घेतलेला आहे. फक्त मोदी अमेरिकेहून परत येण्याची आणि पितृपक्ष संपण्याची वाट पाहिली जात होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर मोदींचे शिक्कामोर्तब होणे इतकेच बाकी होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जसा काश्मीर हा मुद्दा राहणार आहे, तसाच अमेरिकेतील मुत्सद्देगिरीही. ही निवडणूक राज्यांची आहे, काश्मीर वा आंतरराष्ट्रीय मुद्दा स्थानिक निवडणुकीत काय कामाचा, असा उलटा प्रचार विरोधकांनी कितीही केला तरी त्याचा उपयोग होण्याची शक्यता नाही. अन्यथा, दिल्ली भाजपने मोदींसाठी स्वागतयात्रा आयोजितच केली नसती.

मोदींच्या अमेरिका दौऱ्याबद्दल भारतीय प्रसारमाध्यमांमधून फक्त सकारात्मक गोष्टीच सांगितल्या जात आहेत. पण ह्य़ुस्टनमधील त्यांचा संपूर्ण कार्यक्रम नियंत्रित होता. त्या कार्यक्रमाला कोणाला प्रवेश द्यायचा, हे ठरलेले होते. भारतावर वा मोदींवर टीकाटिप्पणी करणाऱ्यांना मनाई करण्यात आली होती. त्यातील एक नाव होते हसन मिन्हाज या स्डॅण्डअप कॉमेडियनचे. ‘नेटफ्लिक्स’वर हसनचा ‘पेट्रिअट अक्ट’ हा जगभरातील राजकीय घडामोडींचा पोलखोल पद्धतीचा कार्यक्रम कोणी पाहात असेल, तर हसन काय करतो हे लगेच लक्षात येईल. हसनचा हा कार्यक्रम जबरदस्त लोकप्रिय आहे. हसन दुसऱ्या पिढीतील भारतीय आहे. त्याचा जन्म अमेरिकेतील असला, तरी त्याला हिंदी-उर्दू बोलता येते. त्याची पत्नी हिंदू आहे. त्याचे मूळ भारतीय असल्याने तो भारताबद्दल संवेदनशील आहे; पण तरीही तो विनोदाच्या माध्यमातून परखड टीका करायला कमी करत नाही. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतातील निवडणुकीवरील कार्यक्रमात हसनने मोदींवर विनोद केला होता. त्यावरून त्याला समाजमाध्यमांवरून ट्रोल केले गेले होते. बहुधा मोदींवरील विनोदामुळे हसनला मोदींच्या कार्यक्रमात प्रवेश मिळाला नसावा. भारताने बुद्धाची शिकवण दिली असली, तरी ती ह्य़ुस्टनमध्ये दिसली नाही. विनोदाचे वावडे असलेल्या आपल्या पंतप्रधानांना ‘हाउडी, मोदी!’ हे विचारण्याची संधी हसनने गमावली. स्टेडियममध्ये जाण्यापासून त्याला रोखण्यात आले. याचा अर्थ इतकाच की, पंतप्रधानांचा अमेरिका दौरा हा आपल्या समर्थकांची स्वत:च्या पाठीवर थाप मारून घेण्यासाठी आयोजित केलेला ‘इव्हेंट’ होता. या इव्हेंटमुळे- ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनवायचे आहे, हा संदेशही मोदींकडून त्यांच्या तेथील समर्थकांना मिळाला.

मोदींच्या अमेरिकावारीतून भाजपमधील आणखी एक गोष्ट उघड झाली. भाजपचे महासचिव राम माधव यांचे पक्षातील महत्त्व कमी झाल्याचे यानिमित्ताने पक्षातील लोकांना समजले. मोदींचा प्रत्येक अमेरिका दौरा ऐतिहासिक मानण्याची प्रथा भाजपमध्ये असली, तरी मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर न्यू यॉर्कमध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनवर झालेल्या जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात राम माधव सक्रिय होते. त्या अमेरिकावारीच्या यशाचे श्रेय राम माधव यांना दिले गेले होते. या वेळी मात्र पक्षाचे हे प्रसिद्धीलोलुप महासचिव कुठेही दिसले नाहीत. मोदींच्या दौऱ्यापासून त्यांना कोसो लांब ठेवण्यात आलेले होते. अधिक सक्रिय होते विजय चौथाईवाले. चौथाईवाले भाजपच्या परदेशनीतीच्या आखणीकारांपैकी एक. या वेळी चौथाईवाले यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. राम माधव एकेकाळी मोदी-शहांच्या अत्यंत विश्वासातले मानले जात असत. जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या आघाडी सरकारमधून भाजप बाहेर पडल्याची घोषणा राम माधव यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भाजपच्या निर्णयाची माहितीही नव्हती, असे त्या वेळी बोलले गेले. राम माधव यांना काश्मीर वा ईशान्येकडील राज्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचेही सांगितले जाते. राम माधव यांचे पक्षातील स्थान घसरण्याला शहा यांची खप्पामर्जी कारणीभूत असावी. वृत्तवाहिन्यांवर भाजपच्या सत्तास्थापनेबद्दल उघडपणे बोलणे, भाजपला बहुमत मिळण्याबद्दल शंका व्यक्त करणे, परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांशी त्यांची असलेली ऊठबस अशा अनेक बाबी शहांना पसंत नसल्याने माधव यांच्याबद्दलचे प्रेम थोडे कमी झाले असावे. तसेही भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला प्रसारमाध्यमांशी जास्त बोलण्यावर भाजपमध्ये मनाई असते. न बोलता काम करण्याचा संकेत मोडल्याची किंमत राम माधव यांना भोगावी लागत आहे, असे दिसते.

मोदींना आजच्या काळातील ‘नेहरू’ व्हायचे असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. भाजप पं. नेहरूंची कितीही बदनामी करत असला, तरी मोदींना कित्ता गिरवावासा वाटतो तो नेहरूंचाच! अटलबिहारी वाजपेयींचे अत्यंत जवळचे सहकारी पं. नेहरूंची एक आठवण सांगतात. वाजपेयी पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले होते. संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत वाजपेयींनी नेहरूंवर परखड टीका केली होती. जनसंघाच्या या तरुण खासदाराच्या शैलीने नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते. आपल्या विरोधात वाजपेयींनी केलेले संपूर्ण भाषण नेहरूंनी लोकसभेत बसून ऐकले. त्याच दिवशी संध्याकाळी नेहरूंच्या उपस्थितीत विदेशी नेत्यांसाठी स्नेहसमारंभ आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला वाजपेयीही होते. पंतप्रधानांवर टीका केल्यामुळे वाजपेयी नेहरूंपासून दूर पळत होते. नेहरूंनी वाजपेयींना हाक मारली. विदेशी पाहुण्यांना वाजपेयींच्या सकाळच्या भाषणाबद्दल सांगितले. वाजपेयी हे भविष्यातील पंतप्रधान असल्याचे कौतुकोद्गार काढले. विरोधी पक्षाच्या नेत्याचे कौतुक करण्याचा उमदेपणा नेहरूंकडे होता. नेहरू जागतिक नेते होते. देशविदेशातील लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. विदेश दौरे यशस्वी करण्यासाठी अनिवासी भारतीयांची त्यांना कधीही गरज भासली नाही, ना त्यांनी कधी स्वत:च्या टीकाकारांना थोपवले. जागतिक नेता बनण्यासाठी व्यापकतेची आवश्यकता असते, देशांतर्गत सुडाच्या राजकारणाची नव्हे, हे बाळकडू नेहरूंनी वाजपेयींना दिले. वाजपेयींनी ते अखेपर्यंत जपले. त्यांच्या वारसदारांना मात्र त्या शिकवणीचा विसर पडला असल्याचे गेल्या चार महिन्यांतील ‘ईडी’करणामुळे तरी वाटू लागले आहे.

mahesh.sarlashkar@expressindia.com