वाचनसंस्कृती लयाला गेल्याचे दावे खोडून काढणाऱ्या आणि दोन शतकांत ग्रंथविश्वात झालेल्या आमूलाग्र स्थित्यंतरांतही आपले स्थान राखून असलेल्या ‘रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया’चा पैस दिवसागणिक वाढतच चालला आहे. आपला हा वाढता पसारा सामावून घेण्यासाठी वाचनालयाला गरज आहे, नव्या इमारतीची आणि त्यासाठी आर्थिक योगदानाची…
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जयस्तंभ चौक आहे. तेथे डावीकडे वळल्यानंतर पहिलीच इमारत वाचनालयाची आहे.
ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या ‘कोकण बुक सोसायटी’चे रूपांतर आता ‘रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया’त झाले आहे. बालवाचकांना आकर्षित करून घेण्यासाठी सुट्टीत बालवाङ्मय उपलब्ध करून देऊन मुलांना वाचनासाठी उद्याुक्त केले जाते.
सातत्याने दीर्घ काळ उत्तम काम करणाऱ्या संस्थांची देदीप्यमान परंपरा महाराष्ट्रात आहे. लवकरच द्विशतक पूर्ण करणारे रत्नागिरी येथील रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय या मालिकेत अग्रस्थानी आहे. मात्र या वाटचालीत जुन्या इमारतीची पडझड झाल्यामुळे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रकल्प वाचनालयाने हाती घेतला आहे.
या वाचनालयाच्या प्रारंभाचा इतिहास रंजक आहे. देशात ब्रिटिशांची राजवट असताना त्यांचे अनेक अधिकारी देशाच्या विविध भागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत होते. यापैकी काही अधिकाऱ्यांना दैनंदिन कामे वगळता इतर क्षेत्रांमध्येही रुची होती. त्यामुळे त्यांनी तशा संस्थांना चालना दिली. त्यापैकी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रत्नागिरीत आलेल्या जे. एच. ट्रॉट यांनी १८२८ साली ‘कोकण बुक सोसायटी’ या नावाने इथे वाचनालयाची स्थापना केली. कालांतराने त्याचे ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे नामकरण करण्यात आले. त्या काळात तिथे स्थायिक असलेल्या ब्रिटिश अधिकारी किंवा उच्चभ्रू भारतीयांनाच वाचन विरंगुळा म्हणून ट्रॉट यांनी ही सुविधा निर्माण केली होती. त्या वर्तुळातील बहुसंख्य व्यक्ती वाचनालयाच्या सभासद झाल्या. स्थैर्यासाठी पोषक परिस्थिती असतानाच एक विचित्र घटना घडली.
वाचनालयात एलिझाबेथ राणीची तसबीर लावलेली होती. एक दिवस वाऱ्या-वादळामुळे ती खाली पडून फुटली. पण ब्रिटिश सत्तेबाबतची नाराजी व्यक्त करण्यासाठी कोणीतरी मुद्दामच हा उपद्व्याप केला असावा, असा वरिष्ठांचा समज झाला. त्यामुळे कोणाही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या वाचनालयाशी संबंध ठेवू नयेत, असा फतवा काढून तत्काळ कार्यवाही झाली. स्वाभाविकच अधिकाऱ्यांच्या वर्गणीवर चाललेले हे वाचनालय बंद पडले. पण काही काळानंतर न्या. एम. पी. खारेघाट यांची येथील न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. सामाजिक उपक्रमांमध्ये रस असलेल्या खारेघाट यांनी या वाचनालयाबाबत चौकशी केली. कोणताही घातपात झाला नसल्याची खात्री पटल्यावर त्यांनी वाचनालय पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांना अर्ज पाठवला. त्यांचे सरकार दरबारी वजन असल्याने अधिकाऱ्यांनी तो मान्य केला आणि वाचनालयाचे पुनरुज्जीवन झाले. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानहून सुटून आल्यानंतर काही काळ रत्नागिरीत वास्तव्याला होते. त्यांनीच ‘रत्नागिरी नगर वाचनालय’ असे नव्याने नामकरण केले. लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर टिळक, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्यासारखी मान्यवर मंडळी त्यांच्या हयातीत येथील नियमित वाचक होते.
स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची ४०० चौरस मीटर जमीन २० वर्षे कराराने भाडेतत्त्वावर नगर वाचनालयाला देण्यात आली. तेव्हापासून आजतागायत त्याच जागेवर हे वाचनालय सुरू आहे. मात्र त्याची सर्व आर्थिक जबाबदारी पूर्णपणे वाचनालयावर आहे. ‘जिल्हा’ ग्रंथालय म्हणून १९७६ मध्ये वाचनालयाला शासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे पुन्हा नाव बदलून ‘रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय’ असे करण्यात आले. त्यानंतर गेल्या सुमारे पन्नास वर्षांत डॉ. ज. शं. केळकर (१९६७-७४), डॉ. वि. म. शिंदे (१९७४-९७) श्रीकांत शेट्ये (१९९७-९८/ १९९९-२००३) इत्यादींनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषवले. प्रसिद्ध लेखिका आणि भाजपाच्या माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर याही राजकारणात येण्यापूर्वी वाचनालयाच्या पदाधिकारी होत्या. या पदाधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत वाचनालयाच्या सभागृहाचा दुसरा मजला बांधून पूर्ण झाला. प्रसिद्ध साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली १९९० च्या डिसेंबर महिन्यात आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद वाचनालयाने यशस्वीपणे पेलले. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, विद्या बाळ, गंगाधर पानतावणे, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर इत्यादी नामवंत साहित्यिकांनी या संमेलनाला हजेरी लावली. २००३पासून अॅडव्होकेट दीपक पटवर्धन वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. वाचनालय विकासाच्या दृष्टीने ते प्रयत्नशील असून नवी इमारत बांधण्याचा प्रकल्प त्याचाच भाग आहे.
सध्या वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृतमधील एकूण एक लाखापेक्षा जास्त ग्रंथ आहेत. १८ व्या शतकातील काही पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. या सर्व पुस्तकांची तपशीलवार सूची वाचनालयाने विकसित केलेल्या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. सुमारे बाराशे सदस्य असलेल्या या वाचनालयाने करोना काळातही घरपोच पुस्तके पाठवून आपल्या वाचकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली. वाचलेल्या पुस्तकावर लक्षवेधी टिपण लिहिणाऱ्या वाचकांना पारितोषिक दिले जाते. दरवर्षी प्रौढ आणि बाल गटातील प्रत्येकी पाच सदस्यांना उत्कृष्ट वाचनासाठी ‘ग्रंथसखा’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. वाचनालयासाठी दरवर्षी खरेदी केल्या जाणाऱ्या पुस्तकांबरोबरच वाचकांच्या मागणीनुसारही पुस्तके मागवली जातात.
या दोन दशकांत वाचनालयाच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच सुमारे अडीचशेहून अधिक साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यात तीनदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन, मेधा पाटकर, डॉ. अभय बंग, डॉ. जयंत नारळीकर, नितीन गडकरी, धनश्री लेले, अच्युत गोडबोले इत्यादी मान्यवरांची व्याख्याने इत्यादींचा समावेश होता. त्यातून रत्नागिरीकरांचे साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक पोषण झाले.
वाचनालयाला लवकरच नवी वास्तू मिळणार आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीचे बांधकाम सुमारे १२ हजार चौरस फूट असून येत्या नोव्हेंबरपासून नवीन इमारतीत कामकाज सुरू करण्याचा मनोदय आहे. इमारतीचा तळमजला जवळजवळ पूर्ण झाला असून पहिल्या मजल्याचे काम सध्या सुरू आहे. तिथे बाल विभाग, महिला वाचक विभाग व डिजिटल वाचन विभाग सुरू करण्यात येणार आहे. प्रमुख प्रकाशनांच्या पुस्तकांचे विक्री केंद्रही इथे असेल. सभागृहाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.
डिजिटल मीडियाच्या आजच्या जमान्यात पारंपरिक वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची चर्चा अनेकदा ऐकू येते. बदलत्या काळाबरोबर वाचकांची रुचीही बदलत गेली आहे. ज्ञान किंवा माहिती मिळवण्याचे इतर पर्याय उपलब्ध झाल्याने वाचनालयात जाण्याची सवय कमी होऊ लागली आहे. या सर्व आव्हानांना तोंड देत वाचक चळवळ पुढे नेण्याचा वसा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने जपला आहे. त्यासाठी आवश्यक भौतिक सुविधांचाही विकास केला जात आहे. वाचनालयाची नियोजित इमारत म्हणजे भविष्याचा वेध घेत टाकलेले एक दमदार पाऊल आहे. त्याला बळकटी येण्यासाठी गरज आहे, उदार हातांची!
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी
RATNAGIRI JILHA NAGAR VACHANALAY, RATNAGIRI
या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
● बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, गांधी भवन, कोथरूड शाखा
● खाते क्रमांक : ९०८१००१०७५०४
● आयएफएससी : सीओएसबी००००९०८
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा…
महापे कार्यालय, संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
मुंबई कार्यालय, लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
नागपूर कार्यालय, संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
पुणे कार्यालय, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
ठाणे कार्यालय, संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२
दिल्ली कार्यालय, संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००