महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सात जणांनी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल केले. ३० जूनला ही निवडणूक होणार आहे. गतवेळी परस्परांशी हातमिळवणी करणाऱ्या मनसे, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये यंदा या पदावरून चांगलीच जुंपली आहे. दुसरीकडे संबंधितांमधील बेबनावाचा काही लाभ उठविता येतो काय, याची चाचपणी काँग्रेस व राष्ट्रवादी करत आहे.
महापालिकेच्या आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या १६ सदस्यांच्या स्थायी समितीत सत्ताधारी वा विरोधक असे कोणाचेही बहुमत नाही. पहिल्या वर्षी पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या मनसे-भाजपला हे पद गमवावे लागले होते. त्यामुळे दुसऱ्या वर्षी संबंधितांनी शिवसेनेशी जुळवून घेत ते आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले. समितीत सत्ताधारी मनसेचे पाच व भाजपचे दोन तर शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, काँग्रेसचे दोन व अपक्षांचा एक सदस्य आहे. गतवेळी शिवसेनेच्या सहकार्यामुळे मनसेला हे पद आपल्याकडे राखणे शक्य झाले. त्या वेळी पुढील काळात हे पद भाजप व सेनेला दिले जाईल, अशी तडजोड झाल्याचे सांगितले जाते. मात्र, आता मनसे, भाजप व सेना या तिन्ही पक्षांनी त्यावर दावा सांगत आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मनसेतर्फे अ‍ॅड. राहुल ढिकले, भाजपच्या वतीने रंजना भानसी, शिवसेनेचे सचिन मराठे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र महाले, काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे व राहुल दिवे या सात उमेदवारांनी एकूण १५ अर्ज सादर केले. सभापती पदावरून मनसे, भाजप व शिवसेनेत जुंपली असताना त्याचा काही लाभ उठविता येईल काय याची चाचपणी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने चालविली आहे. पहिल्या वर्षी शिवसेनेच्या मदतीने चमत्कार घडविण्यात विरोधकांना यश आले होते. सध्या परस्परांमधील वादामुळे पुन्हा तशी स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा विरोधक बाळगून आहेत.
सभापती भाजपचाच होणार
महापालिकेत मनसेचा भाजप हा मित्रपक्ष आहे. मागील स्थायीच्या निवडणुकी वेळी शिवसेना त्यात समाविष्ट झाली. त्या वेळी यंदा हे पद भाजपला दिले जाईल, असे निश्चित झाले होते. पुढील वर्षी हे पद शिवसेनेला दिले जाईल. तिन्ही पक्षांना परस्परांचे सहकार्य लागणार आहे. मनसे व शिवसेनेच्या सहकार्याने यंदा भाजपचाच सभापती होईल हे निश्चित.
– लक्ष्मण सावजी
शहराध्यक्ष, भाजप
..तर चमत्कार घडू शकतो
मागील वेळी मनसे-भाजपने शब्द दिला होता. त्यानुसार संबंधितांकडून हा शब्द पाळला जाईल अशी अपेक्षा आहे. स्थायी समितीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने ठरविले तर चमत्कार घडू शकतो. याआधी असे चमत्कार घडलेले आहेत.
– अजय बोरस्ते,
महानगरप्रमुख, शिवसेना