स्थानिक स्वराज्य करामुळे (एलबीटी) आधीच महापालिका आर्थिक संकटात असताना महापालिकेमध्ये मात्र एकामागून एक घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असून अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले जात आहेत. गेल्या काही वर्षांत नागपूर विकास आघाडीतर्फे प्रशासनाच्या सहकार्याने एकीकडे शहरात विविध उपक्रम राबवित असताना केवळ भारतातच नव्हे तर जगात त्याचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे मात्र महापालिका भ्रष्टाचार आणि लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे बदनाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ कर्मचारी विनोद धनविजय आणि ऐवजदार पंकज पाटील यांना कार्यालयीन वेळेतच गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाच्या देयकावरून ३० हजार रुपयाची लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर महापालिकेतील एकच खळबळ उडाली. विनोद धनविजय हे गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असून त्यांची या विभागातून बदली करण्यात आली नाही. धनविजय आणि पाटील यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर महापालिकेत खरे तर अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली मात्र दोघांनाही पोलिसांनी अटक केल्यानंतर महापालिका परिसरात लाच घेण्याचा प्रकार नवीन नाही अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महापालिकेत सामान्य लोकांची कामे सहजासहजी होत नाही हा महापालिकेचा इतिहास आहे.
एखादे काम करून घेण्यासाठी प्रत्यचेकाला किमान पाच ते सहा वेळा महापालिकेच्या खेटा घालाव्या लागतात. शिवाय एखादे काम करून घ्यायचे असेल तर आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय ते केले जात असे महापालिका परिसरात दलाल बोलू आता लागले आहे मात्र, त्यांच्यावर ना प्रशासनाचा, सत्ता आणि विरोधी पक्षाचा पक्षाचा वचक आहे. सत्तापक्ष आणि आयुक्तांनी मधल्या काळात प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते फारसे यशस्वी झाले नाही आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेत गेल्या पाच सहा महिन्यात एकामागोमाग घोटाळे समोर येत आहे. स्टार बस घोटाळा गाजत असताना पदभरती, मालमत्ता, वाहतूक आणि भंगार घोटाळा समोर आला आहे. त्यानंतर स्वच्छता मशीन घोटाळा समोर आला असून त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून नागनदी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान, प्लास्टार ऑफ पॅरिस मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन आदी योजना यशस्वीपणे राबविल्यानंतर त्याचे देशविदेशातून कौतुक झाले.
राज्य आणि केंद्र पातळीवर पुरस्कार मिळाले असताना अशा भ्रष्टाचार आणि विविध घोटाळ्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होण्याची चिन्हे आहेत. सामान्य लोक एकीकडे कौतुक करीत असताना दुसरीकडे मात्र अशा घोटाळ्यामुळे नागरिक वाईट बोलू लागले आहेत. सत्तापक्षासहीत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच आळा घातला नाही तर आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेत स्वच्छ प्रतिमा निर्माण करताना असे एकामागून एक घोटाळे जर समोर येऊ लागले आणि त्यावर कुठलाही वचक राहिला नाही तर सत्तापक्षाला अनेक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मनपात भ्रष्टाचाराची बजबजपुरी
स्थानिक स्वराज्य करामुळे (एलबीटी) आधीच महापालिका आर्थिक संकटात असताना महापालिकेमध्ये मात्र एकामागून एक घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असून अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-09-2013 at 08:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption and scams cases are incresing bmc