साखरेचे पडलेले भाव, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती, साखरेचे उत्पादन व विक्रीतील तफावत याचा मेळ घालून मांजरा परिवार मराठवाडय़ात उसाला सर्वाधिक भाव देईल, अशी घोषणा आमदार दिलीपराव देशमुख यांनी केली.
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २७व्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. या प्रसंगी आमदार देशमुख बोलत होते. साखर कारखाने हे डोके आहे तर शेतकरी शरीर आहे. शरीराने डोके उडवण्याचा प्रयत्न केला तर नुकसान कोणाचे होणार? धुराडे पेटवू देणार नाही, ऊस कारखान्याला दिला जाणार नाही, अशी भाषा वापरण्यापेक्षा चच्रेतून प्रश्न सोडवू. शेतकऱ्यांना बरोबर घेऊन व चच्रेतून उसाचे भाव ठरवले जातील. मराठवाडय़ातील सर्वाधिक भाव मांजरा परिवार देईल. ऊस कमी पडल्यास बाहेरच्या कार्यक्षेत्रातून ऊस आणून गाळप केले जाईल. सर्वाना सोबत घेऊन सहमतीचे राजकारण करण्याचा धडा विलासराव देशमुख यांनी घालून दिला. त्याच आधारावर कारखान्याची वाटचाल सुरू राहील, असे देशमुख म्हणाले. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, अॅड. त्र्यंबकदास झंवर, आमदार वैजनाथ िशदे, अॅड. व्यंकट बेद्रे, जगदीश बावणे उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
‘ ‘मांजरा’च्या बरोबरीने ‘जागृती’चा भाव’
जागृती साखर कारखाना खासगी असला तरी मांजरा परिवारातील आहे. ‘मांजरा’च्या बरोबरीने ‘जागृती’ उसाला भाव देणार असल्याची ग्वाही आमदार देशमुख यांनी दिली. देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईड या कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. कारखाना क्षेत्रातील मागील हंगामात सर्वाधिक ऊस देणाऱ्या ५ शेतकऱ्यांच्या हस्ते हंगामास प्रारंभ करण्यात आला.
ऊस लागवडीसाठी बिनव्याजी ३ कोटी रुपये ऊसउत्पादकांना देण्यासाठी राखीव ठेवल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. कमीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. उत्पादन वाढल्यास बाहेरून ऊस आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वाहतूक खर्चही वाचेल व उसाला अधिक भाव देणे सहज शक्य होईल. कारखान्याच्या वतीने वीजनिर्मिती होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा भासू नये यासाठी कारखाना प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नॅचरल’ ही सर्वाधिक भाव देणार- ठोंबरे
नॅचरल शुगरने गळीत हंगामासाठी साडेसात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी बाहेरून ऊस आणला जाईल व मराठवाडय़ात सर्वाधिक भाव ‘नॅचरल’ देईल, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरलच्या चौदाव्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते गळितास प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रकाश बोधलेमहाराज, सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे, डॉ. सर्जेराव साळुंके, सुशीला साळुंके उपस्थित होते.
ठोंबरे म्हणाले, की सन १९९९मध्ये दीड हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या कारखान्यास प्रारंभ केला. चौदा वर्षांत साडेसात लाख टन गाळप क्षमता वाढवली. साखर उत्पादनाबरोबर उपपदार्थनिर्मिती, ग्रामीण रुग्णालय, इंग्लिश स्कूल, संगणक महाविद्यालय, जलसंधारण योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मागील वर्षी कार्यक्षेत्रातील ९ गावांत जलसंधारण योजना राबवल्यामुळे पाणीपातळी ५० फुटांनी वाढली. त्यामुळे या गावांत उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात होत आहे. आगामी काळात जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर घेऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचा मानस आहे. कारखाना कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. गतवर्षी मराठवाडय़ात सर्वाधिक उसाचा भाव २ हजार ३०० प्रतिटन नॅचरलने दिला. याही वर्षी आपण सर्वाधिक भाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. के. एम. नागरगोजे, प्रकाश बोधले, सचिन पाटील यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन पांडुरंग आवाड यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give furthest rate to sugarcane in marathwada