जिल्ह्य़ात सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात शेततळी फुटल्याने पिके वाहून गेली. पीक नुकसानीबाबत कृषी विभागाचा अभिप्राय मागविला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पावसामुळे २६ लघुप्रकल्पांपैकी ४ शंभर टक्के भरले. ४ जोत्याखाली, ४ प्रकल्प ५१ ते ७५ टक्के, ५ प्रकल्प २५ ते ५० टक्के, तर ९ प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्य़ात या वर्षी सरासरी ४१.८२ टक्के पाऊस पडला. गतवर्षी याच तारखेला १६.२२ टक्के पावसाची नोंद झाली होती. बासंबा, डिग्रस कऱ्हाळे, डोंगरगाव, सोडेगाव, नांदापूर, सालेगाव, रूपूर, सावंगी, हारवाडी आदी नदीकाठच्या गावांच्या शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पेडगाव वाडीतील पाझर तलावाचा बांध फुटल्याने त्या भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
बोरीशिकारी येथील यशोदा गणेश गिरी ही मुलगी औंढय़ाच्या पुरात वाहून गेली. तिचा मृतदेह नंतर मिळून आला. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या या मुलीची तहसीलदारांनी माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा अभिप्राय मागविला असून तो मिळाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss of harvest on kayadhu river shore