राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊन आत्महत्या थांबवण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी पथदर्शी योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली. एकीकडे जिल्ह्याच्या पदरात समाधानाचे दान टाकले असले तरी दुसरीकडे मात्र अर्थमंत्र्यांना अन्य प्रकल्पांचा विसरच पडल्याचे दिसून येते.
बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ रेल्वे प्रकल्प, आंध्र आणि महाराष्ट्रासाठी असलेल्या निम्न पनगंगा सिंचन प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, नाटय़गृह आणि यवतमाळ-मूर्तीजापूर या शंकुतला नॅरोगेज रेल्वेसाठी काहीच तरतूद न केल्यामुळे मुनगंटीवार यांनी जनतेचा रोषही ओढवून घेतल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून देशात ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातच कर्जबाजारीपणा, नापिकी आणि इतर अन्य कारणांमुळे राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्या अजूनही थांबलेल्या नाहीत. ही बाब मान्य करून अर्थमंत्र्यांनी यवतमाळ या एकमेव जिल्ह्याची निवड ‘मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजने’ साठी करून ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाची व अल्प भूधारकांना यांत्रिकी शेतीसाठी संपूर्ण अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांची ही योजना थोडेसे समाधान देणारी निश्चितच आहे. मात्र, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आवश्यक असलेला निम्न पनगंगा हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प दुर्लक्षित केला आहे.
महाराष्ट्र-आंध्रप्रदेश या दोन राज्यांसाठी असलेल्या या आंतरराज्यीय सिंचन प्रकल्पासाठी अर्थमंत्री किमान ३०० कोटी रुपयांची तरतूद करतील, अशी अपेक्षा प्रकल्पाचे खंदे समर्थक माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केली होती. १९९७ मध्ये मान्यता मिळालेला हा प्रकल्प मुंगीच्या पावलाने चालत आहे. १५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता २ लाख २७ हजार २७१ हेक्टर क्षेत्र आहे. या प्रकल्पाचे ८८ टक्के पाणी महाराष्ट्रासाठी आणि १२ टक्के पाणी आंध्र प्रदेशासाठी वापरले जाणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो रेल्वेसाठी अर्थमंत्र्यांनी ४८२ कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, पश्चिम विदर्भ, वर्धा आणि मराठवाडय़ातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी, असा उल्लेख करण्यात येत असलेल्या वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ या नवीन रेल्वेमार्गाला गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या ११० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने ४० टक्के अर्थात, ६६ कोटी रुपयांची तरतूद करणे अपेक्षित होते, पण त्यावरही पाणी फेरले आहे. ‘शंकुतला’ नावाने परिचित असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर रेल्वेमार्गाचाही उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही. प्रत्येक जिल्ह्यात नाटय़गृह उभारण्याची घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी मात्र यवतमाळातील रखडलेल्या व साडेचार कोटी रुपये खर्च झालेल्या नाटय़गृहासाठी एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही आणि टेक्सटाईल झोनबाबतही शब्द काढला नाही. जिल्ह्यातील मुंगसाजी महाराज समाधी स्थळ विकसित करणे, उमरखेड आणि उमरी येथील अनुक्रमे चौधरी आणि पाळेकर या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची घोषणा करून हुतात्मांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2015 रोजी प्रकाशित
कृषी समृद्धीसाठी यवतमाळची निवड, अन्य प्रकल्पांचा मुनगंटीवारांना विसर
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देऊन आत्महत्या थांबवण्यासाठी
First published on: 20-03-2015 at 02:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mungantiwar forgot about others projects