अ. भा. आंतरविद्यापीठ नौकानयन स्पर्धेत पुणे विद्यापीठाला दोन कांस्यपदक मिळवून देणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या सागर नागरे, गोकुळ निकम, किरण उघडे, सागर गाढवे या खेळाडूंना महाविद्यालयातर्फे गौरविण्यात आले.
महाविद्यालयाला गेल्या २० वर्षांत प्रथमच असे यश मिळाले आहे. या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक दिलीप मोरे, माजी चिटणीस प्रताप मोरे, माजी संचालक विश्वास मोरे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविकात खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रा. हेमंत पाटील यांनी खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाची माहिती दिली. कडक थंडीत हिमाचल प्रदेशातील पोंग धरणात ही स्पर्धा झाली. कॅनाइंगच्या वैयक्तिक सी १ प्रकारात सागर गाढवेने कांस्य पदक मिळवले. सांघिक सी ४ प्रकारात सागर गाढवे, सागर नागरे, गोकुळ निकम, किरण उघडे यांच्या संघाला उपांत्य फेरीत अमृतसरच्या गुरुनानक विद्यापीठाकडून अवघ्या दोन मीटरच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत मात्र या खेळाडूंनी केरळवर मात केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या खेळाडूंसह जितेंद्र पवार, कुणाल नीलकंठ, प्रशांत शेळके या क्रीडापटूंनाही गौरविण्यात आले.