उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘देवगिरी’ सुसज्ज झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या चार-पाच दिवसापांसून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाच वावर वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात विदर्भातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची सूत्रे देवगिरीमधून हलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानानंतर सर्वाधिक चर्चेत असणारे हे निवासस्थान आहे.
देवगिरीची गेल्या एक महिन्यापासून रंगरंगोटी आणि साफसफाई केली जात असून नवीन फर्निचर लावण्यात येत आहे. शरद पवार १२ डिसेंबरला नागपूरला आले की, त्यांचा मुक्काम देवगिरीत राहणार असल्यामुळे देवगिरी सुसज्ज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देवगिरीच्या मुख्य दाराशेजारी दरवर्षी एक चौकी उभारण्यात येत असताना यावेळी दोन चौकी उभारण्यात येणार आहे.
सी.पी. अ‍ॅण्ड बेरार काळात ‘देवगिरी’ हे आंतरराज्य नियंत्रण मंडळाचे कार्यालय होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त झाला. ठरल्यानुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जाते. या काळात उपमुख्यमंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था या कार्यालयात करण्यात येऊ लागली. या निवासस्थानाला देवगिरी हे नाव देण्यात आले. या इमारतीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. ९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या बंगल्याची डागडुजी आणि रंगरंगोटी जवळपास पूर्ण झाली असून सध्या फर्निचरचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी नवीन फर्निचर आणले असताना यावर्षी पुन्हा नवे फर्निचर खरेदी करण्यात आले आहे. एकदंरीत हे निवासस्थान सुसज्ज केले जात असून त्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी निवासस्थानाच्या बाजूला मंडप उभारण्यात येत आहे. लॉनचे उत्तम पद्धतीने सुशोभिकरण करण्यात येत असून विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निवासस्थानाच्या उत्तरेकडे लोखंडी पत्रे लावण्यात आली आहेत.
देवगिरीत तीन मोठे सभागृह असून तीन लहान खोल्या आहेत. यात उपमुख्यमंत्री खास व्यक्तींसोबतच चर्चा करतात. अन्य मोठय़ा सभागृहात शिष्टमंडळांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची आतापासूनच चौकशी केली जाते. देवगिरीला लागूनच अन्य मंत्र्यांचे निवासस्थान असल्याने अधिवेशन काळात या परिसरात नागरिकांची, अधिकाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला दिसून येतो. अधिवेशन सुरू व्हायला अजून चार दिवस असले तरी देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंची गर्दी बघता अधिवेशन सुरू झाले की काय, असे येथील लगबग पाहून वाटते. देवगिरी परिसरातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. बंगल्यासमोर असलेल्या लॉन सुशोभित करण्यात आले असून येणाऱ्या कार्यकर्त्यांंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवगिरीकडे येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. ज्यांच्याजवळ प्रवेश पत्र आहे त्यांनाच देवगिरीत प्रवेश दिले जाणार आहेत.