एकटी राहणारी एक वृद्ध विधवा महिला घरात मृतावस्थेत आढळली. या घटनेने सोमवारी सकाळी वाडी परिसरात खळबळ उडाली. तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
भगवती सुनील चंदा हे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून ती आठवा मैल परिसरातील रामजी आंबेडकरनगरात एकटीच रहात होती. तिचा एक मुलगा चंद्रपुरात नोकरी करतो. दुसरा मुलगा श्याम नागपुरातील अयोध्यानगरात त्याच्या कुटुंबासह राहतो. चंद्रपुरातील मुलाने सकाळी आई भगवतीला भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला. तिचा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने श्याम याला हे सांगून आईकडे जायला सांगितले. श्यामनेही आईला संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही. तो सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आईच्या घरी पोहोचला. घराच्या दाराला कुलूप होते. त्याने दार वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही.
श्यामने शेजारच्यांना ही बाब सांगितली. त्यांनीही प्रयत्न केला. अखेर त्यांनी पोलिसांना बोलावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह वाडी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी समोरचे दार तोडले. घरात भगवती मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. तिच्या गळ्यावर तिने घातलेल्या साडीने आवळल्याचे वळ होते. इतर कुठलीही चिन्हे नव्हती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छदन अहवालाअंतीच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old women fount dead in house