नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात प्रथमच पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेस आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्या, मंगळवारी काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन निकाल देण्याची तंबी देणार असल्याची चर्चा आहे.
येत्या २० जूनला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यावेळी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. बबनराव तायवाडे रिंगणात असून त्यांची टक्कर महायुतीचे प्रा. अनिल सोले यांच्याशी होत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस केवळ विशिष्ट उमेदवारास समर्थन देत असे. पक्षाने शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघाचे राजकारण करू नये, असा पक्षप्रवाह होता, पण यावेळी काँग्रेस- राकाँने राज्यभरातील असे मतदारसंघ वाटून घेत स्वत:चे उमेदवार उभे केले आहेत. गतवेळी पक्षाचे केवळ समर्थन लाभलेले डॉ. तायवाडे यावेळी अधिकृत उमेदवार आहेत. गतवेळी केवळ समर्थन होते. त्यामुळे त्यावेळचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेस- राकाँच्या नेत्यांना गळाला लावत मुसंडी मारली होती. राकाँचे प्रफु ल्ल पटेल व काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी गडकरींची संगत केली होती.
यावेळी पटेलांनी गोंदियात डॉ. तायवाडेंसाठी सभा घेऊन समर्थनाची ढाल उभी केली आहे, पण ही जागा येनकेन प्रकारे पदरात पाडायचीच, असा निर्धार खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे. नागपुरात उद्या, मंगळवारी डॉ. तायवाडेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री चव्हाण यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. यात राकाँच्याही आमदारांची हजेरी लागण्याची शक्यता एका तायवाडे समर्थकाने बोलून दाखविली. लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवाने काँग्रेसजन अद्याप पराभूत मानसिकतेत वावरत असल्याचे चित्र आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचाच गड रािहल्याचा इतिहास आहे. गंगाधरराव फ डणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी हा किल्ला राखला. एकदा तर निवडणूक होऊ न देता अविरोध निवडून येण्याचा विक्रम गडकरींनी केला. या सगळ्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसजनांमध्ये उर्मी जागविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होणार असल्याचे समजते. नागपूर विभागातील बहुसंख्य शाळा-महाविद्यालये काँग्रेस नेत्यांच्या हातात आहेत. जवळपास सर्वच आमदारांकडे शैक्षणिक संस्था आहेत. ही कुमक पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी कामात येईल कां, असा प्रश्न उपस्थित केला जातो. गडकरींच्या सामर्थ्यांमुळे व काँग्रेसचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याने यापूर्वी बरेचशे काँग्रेस नेते स्वत:च्या सोयीने मतदाराची दिशा ठरवित. आता तसे नाही. गडकरींनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रा.सोलेंची उमेदवारी घोषित केल्याने संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. तसेच प्रत्युत्तर काँग्रेस- राकाँकडून देण्याची व्यूहरचना मुख्यमंत्र्यांनी आखली आहे, पण महत्त्वाची बाब म्हणजे, अडीच लाखाच्या घरात मतदार असणाऱ्या या मतदारसंघात निम्म्याहून अधिक मतदार नागपुरात आहे आणि याच ठिकाणी काँग्रेसचे बळ नगण्य दिसून येते. नागपुरात आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महापालिका अशी सत्तास्थाने भाजपकडे आहेत. त्याची भरपाई नागपूर सोडून इतर पाच जिल्ह्य़ातून करण्याची आघाडीने तयारी चालविली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपुरातील बैठक त्याच पाश्र्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या बैठकीस किती काँग्रेस- राकाँचे आमदार व मंत्री प्रतिसाद देतात, हे मंगळवारीच उमगेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मताधिक्य मिळवून देण्याबाबत तंबी दिली होती, पण मोदी लाटेचा सर्वत्र प्रभाव दिसून आल्याने मताधिक्य न मिळूनही या आमदारांकडे मुख्यमंत्री तिरपा कटाक्ष टाळू शकले नाही.
यावेळी प्रथमच पदवीधर मतदारसंघात अधिकृत उमेदवारी देणाऱ्या काँग्रेस आघाडीपुढे भाजप लाटेचे आव्हान आहेच. मुख्यमंत्री चव्हाण हे काँग्रेसच्या आमदार-मंत्र्यांना काय निर्देश देतात, याकडे डॉ. तायवाडे समर्थकांचे लक्ष आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात प्रथमच पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेस आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्या, मंगळवारी काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन निकाल देण्याची तंबी देणार असल्याची चर्चा आहे.
First published on: 17-06-2014 at 08:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan in nagpur for campaign of dr taywade