गेल्या दशकभरात मुंबईच्या विस्तारीकरणाचा केंद्रबिंदू ठाणे आणि त्यापलीकडच्या उपनगरांच्या दिशेने सरकत असूनही केवळ नव्या घोषणांपलीकडे रेल्वे प्रशासनाने येथील लाखो प्रवाशांना किरकोळ सुविधांपलीकडे काहीही दिलेले नाही. यंदाचा अर्थसंकल्पही त्यास अपवाद नाही. सरकते जिने, पादचारी पूल, नव्या तिकीट खिडक्या अशा सुविधा मिळाल्या, पण या मलमपट्टय़ांनी मूळ दुखणे बरे होऊ शकले नाही. मुळात ठाण्याला नवे विस्तारित स्थानक आणि कल्याणला लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र टर्मिनस असे दोन प्रकल्प मार्गी लागणे ही ठाणे अल्याड आणि पल्याडच्या प्रवाशांची खरी गरज आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात यासारख्या मोठय़ा प्रकल्पांचा साधा उल्लेखही नसल्याने ठाणेकरांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.  
विस्तारित ठाण्यासाठी नवे रेल्वे स्थानक, कल्याण टर्मिनस, वर्ल्ड क्लास दर्जा अशा अनेक घोषणा गेल्या काही वर्षांत करण्यात आल्या, पण सुविधांचा विचार करता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच पडली. एकीकडे मुंबईतील उपनगरी प्रवाशांना मोनो, मेट्रो असे आधुनिक पर्याय उपलब्ध होत असताना मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके असणाऱ्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याणकरांच्या सोयीसाठी पुरेशा ठाणे शटल सेवाही रेल्वे उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. ठाण्याच्या पलीकडे रेल्वेशिवाय वाहतुकीचा दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यात आता कल्याणपल्याडच्या अंबरनाथ, बदलापूर आणि वासिंद येथील औद्योगिक वसाहतींमध्ये ठाणे-मुंबईतून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कर्जत-आसनगाव परिसरातील शैक्षणिक संकुलांमुळेही या गर्दीत भर पडली आहे. त्यामुळे ठाणेपल्याडच्या प्रवाशांसाठी गाडय़ांच्या अधिक फेऱ्या वाढवून मिळाव्यात, अशी प्रवासी संघटनांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निव्वळ घोषणांचा पाऊस..!
आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठाणे स्थानक, कल्याण टर्मिनन्स ठाणे-कर्जत कसाऱ्यासाठी शटल सेवा, कल्याण-माळशेजमार्गे नगर मार्ग, ठाकुर्ली येथील विद्युत प्रकल्प गेल्या काही रेल्वेच्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रमुख्याने ठाशीवपणे मांडले गेले होते. मात्र हे प्रकल्प पुढे केवळ अर्थसंकल्पीय भाषणांपुरतेच मर्यादित राहिले. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद अथवा प्रक्रियाच राबवली गेली नसल्याने या प्रकल्पांच्या दिशेने रेल्वेचे एकही पाऊल उचलले गेले नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्य़ास डोळ्यासमोर ठेवून एकही घोषणा झालेली नाही. इतर स्थानकांना मिळणार त्या प्रमाणेच सर्व सुविधा तुम्हालाही मिळणार असा अर्थसंकल्पाचा एकूण सूर होता. त्यामुळे ठाण्यातील प्रवासी संघटना काहीशा नाराज आहेत. मात्र ए क्लास दर्जाच्या स्थानाकांना मिळणाऱ्या सुविधा जिल्हय़ातील ठाणे, कल्याणसारख्या स्थानकांना मिळणार आहेत तर ८६४ लोकल्समुळे गर्दी कमी होऊन ठाण्याच्या पल्याडचा प्रवास काही अंशी सुखकारक होईल, अशी आशा प्रवासी बाळगून आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थानकापेक्षा प्रवाशांना ठाणे-शटल सेवेत रस आहे. ठाणे ते कर्जत, कसारा या मार्गावर ७४ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र गेल्या चार वर्षांत त्यांपैकी केवळ चार ते पाच फेऱ्या सुरू होऊ शकल्या आहेत.

रेल्वे अर्थसंकल्प ५०-५०
रेल्वेचे अर्थसंकल्प ५०-५० असेच म्हणावे लागेल. सुरक्षेचा मुद्दा घेऊन आरपीएफच्या संख्येत वाढ, लोकलची संख्या वाढवणे आणि कर्जत-लोणावळा आणि कसारा-इगतपुरी नव्या मार्गाची घोषणा सोडल्यास स्थानकांच्या विकासासाठी मात्र कोणताच ठोस कार्यक्रम  या अर्थसंकल्पात नव्हता. त्यामुळे लोकल वाढल्या तरी प्रवाशांना उभे राहण्यासाठी उपयुक्त ठरणारी स्थानके मात्र दुरवस्थेतच आहेत. त्यांचा विकास कधी होणार असे प्रश्न अनुत्तरित आहेत, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे सल्लागार राजेश घनघाव यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway budget disappointing thane