गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी लातूर जिल्ह्य़ातील औसा तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची रोख मदत देऊन भारतीय नववर्ष साजरे करणाऱ्या येथील शौर्य फाऊंडेशनने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच याच जिल्ह्य़ातील निलंगा तालुक्यातील २८ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ किलो सोयाबीनचे बियाणे आणि खताचे एकेक पोते दिले.
शौर्यच्या नीतल वढावकर, अर्चना भोर, रोहित जाधव, चेतन भोसले, समीर राऊळ, सुधीर भोसले आणि योगेश भारगे यांनी निलंगा तालुक्यातील तळी खेड, सावनगिरा आणि माळेगाव (जेऊरी) या गावांत जाऊन तेथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली. विशेष म्हणजे शहरी माणसे मदत घेऊन आलेत म्हटल्यावर ती घेण्यासाठी चढाओढ करण्यापेक्षा सर्वात गरजू शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा समजूतदारपणा ग्रामस्थांनी दाखविल्याचे नीतल वढावकर यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमासाठी ठाणे शहर महिला मंडळ, संपदा रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांनी मदत केली.