हिंगोली आणि औरंगाबादमध्ये राज्य राखीव दलाची केंद्र उद्रेकस्थळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद :  मालेगाव येथे ४५ दिवसाचा बंदोबस्त करुन परतलेल्या  ७३ राज्य राखीव दलाच्या जवानांना करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. औरंगाबादमधील रुग्णांची संख्या शुक्रवारी दुपापर्यंत ४७७ वर पोचली आहे. औरंगाबाद येथून ९३ जवान २२ मार्च रोजी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यापैकी चार जवानांना नाशिकमध्येच करोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित जवान आणि अधिकारी औरंगाबाद येथे आल्यानंतर श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. आता हा परिसरच कोवीड उपचार केंद्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हिंगोली येथेही मुंबई आणि मालेगाव येथून परतलेल्या ८४ जवानांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मराठवाडय़ात शुक्रवारी मालेगाव आणि मुंबईतील बंदोबस्तातील १५६ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद येथे बुधवारी दाखल झालेल्या या जवानांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यावेळीच काही जवानांना सर्दी- खोकला असा त्रास सुरू झाला होता. शुक्रवारी सकाळच्या सत्रात त्याची करोना चाचणी सकारात्मक आल्याचे समजल्यानंतर महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चमू श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयात पोचला. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी भेट देऊन जवानांचे समुपदेशन केले. एरवी गरज भासेल तेवढेच दिवस बंदोबस्त असतो. मात्र, एका ठिकाणी बंदोबस्त असेल तर ४५ दिवस काम दिले जाते, अशी माहिती सहायक समादेशक इलीयास शेख यांनी दिली.

दरम्यान राज्य राखीव दलासाठी म्हणून नियुक्त वैद्यकीय अधिकारी आणि अन्य वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर  उपचार करत असल्याचे इलीयास शेख यांनी सांगितले. हिंगोली येथेही मालेगाव आणि मुंबई येथील बंदोबस्तावरुन परतलेल्या जवानांना करोनाची बाधा होण्याची प्रमाण वाढत गेले आहे. हिंगोली जवानांकडून उपचार आणि जेवणाबाबत तक्रारीही होत्या. त्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यापर्यंत पोचल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी उपचार आणि सुविधांबाबतही लक्ष घातले असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या ४६८ असून,त्यात शहरातील जयभीमनगर, भावसिंगपुरा , शाहबाजार, गारखेडा येथीली ध्याननगर, एन-२, मुकंदवाडी येथीली वदन कॉलीनी येथे प्रत्येकी एक, बायजीपुरामध्ये तीन, कटकट गेट येथे एक, सिंकदर पार्क येथील एका जणांचा समावेश असून खुलताबाद येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 srpf personnel test positive for covid 19 return from malegaon zws