छत्रपती संभाजीनगर – भलेही आमची आता त्यांच्याबरोबर युती नसेल. पण अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी एमआयएम पूर्ण मदत करेल, असे एमआयएमचे प्रमुख असोद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे सांगितले. अकोला लोकसभा मतदार संघातह वंचितला पाठिंबा देताना पुणे येथेही उमेदवार उभा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> धाराशिव : ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

ते म्हणाले, जरी आता आमची वंचित बरोबर युती नसेल तरी दलित आणि वंचित समाजाचे नेतृत्व असावे, हे आमचे मत आहे आणि म्हणून अकोल्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी प्रकाश आंबेडकरांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्या काही महिन्यात एका किरकोळ शरीरयष्टीच्या माणसाने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांना हादरवून टाकले.

मनेज जरांगे यांनी त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी जे काही केले आहे, ते एखादा ‘दिवानाच’ करू शकतो. असा ध्येयवेडेपणा नक्की असायला हवा. म्हणूनच त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. कारण लोकशाहीत मतदान मिळविणे आणि त्याचे नेतृत्व उभं करणे यातूनच विकास घडत असतो. त्यामुळे जरांगे यांनी त्यांच्या पक्ष स्थापन करावा, असे आवाहनही ओवैसी यांनी केले. एमआयएमच्या विजयी उमेदवाराला हरवण्यासाठी साडे पाच पक्ष मैदानात उतरले आहेत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि अर्धी काँग्रेस या साडे पाच पक्षांसमोरही औरंगाबादचा खासदार टिकून राहील, असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी समान नागरी कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी या कायद्यान्वरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, टीकेचा रोख उद्धव ठाकरे गटाकडे अधिक होता. गेल्या तीस वर्षांत काहीही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीने माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले आहे. खरं तर त्यांची निवडणूक २०१९ मध्येच शेवटची होती.