छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून पित्याने मुलीचा गळा दाबून खून केला परंतु आत्महत्येचा बनाव रचला. हे प्रकरण शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले. याप्रकरणी आरोपींना मदत व्हावी, असे आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक लाखाची लाच मागून ७० हजार रुपये स्वीकारणाऱ्या बदनापूर पोलीस ठाण्यातील अमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाच्या पथकाने पकडले. बदनापूर पोलीस ठाण्यात सोमवारी पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या पुतण्यांवर बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडीलांनीच मुलीचा ५ सप्टेंबर रोजी झोपेत असताना गळा दाबून आणि मारहाण करून खून केला. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी गळफास देऊन आत्महत्येचा बनाव रचला. परंतु शवविच्छेदनाच्या अहवालातून श्रावणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा अहवाल प्राप्त झाला. या घटनेतील आरोपींना, जे तक्रारदाराचे पुतणे आहेत, त्यांना गुन्ह्यात मिळालेली पोलीस कोठडी व आरोपपत्रामध्ये वरिष्ठांना सांगून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे अंमलदारांनी एक लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ७० हजार घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी लावलेल्या सापळ्यात अंमलदार अडकले.
