छत्रपती संभाजीनगर : बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर शिक्षा जाहीर झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या कैदी बीड पोलिसांनी सात वर्षांनी पकडले. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे, असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
बहिणीचे प्रेमकरण आणि प्रियकरासोबतच्या लग्नास विरोध करत दोघांवरही आरोपीने प्राणघातक हल्ला केला होता. यात बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना २०१४ मध्ये बीडमध्ये घडली होती. आरोपी भावास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना रजा घेऊन बाहेर आल्यानंतर तो सात वर्षे फरार होता. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने गुरुवारी सायंकाळी शिताफिने पकडले.
पोलीस ठाणे बीड शहर यांचेमार्फत प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल उर्फ सोनूवर बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांर्तगत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यास जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे. या प्रकरणांमध्ये विठ्ठलेला बहिणीचे एका तरुणासोबत असलेले प्रेमप्रकरण मान्य नव्हते. दोघांच्या लग्नालाही विरोध होता. यातूनच बहिणीने विष प्राशन केले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता तेथे प्रियकरासह बहिणीवर विठ्ठलने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर हल्ल्यानंतरही बचावला.
विठ्ठलला शिक्षा झाल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला. परंतु कारागृहात परतला नाही. पोलिसांचा ताबा चुकवून तो फरार झाला. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच प्रकरणात न्यायालयात बीड येथे सीआरपीसी कलमांतर्गत कार्यवाही प्रस्तावित करून जिल्हा शोधपत्रही तयार करण्यात आले होते.
अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक मोहीम काढलेली आहे. या मोहिमेअंतर्गत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते. त्यातील उपनिरीक्षक महेश जाधव, हवालदार गहिनीनाथ बावनकर, अंमलदार राम पवार यांच्या तपास पथकाने फरारी आरोपी विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे यास शोधून ताब्यात घेतले आहे. त्यास आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.