छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील परागंदा असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांनी ‘वाँटेड’ म्हणून गुरुवारी घोषित केले. या तिन्ही आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच त्याला बक्षीसही दिले जाईल, असे पत्रक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पत्रकानंतर उपरोक्त तिन्ही आरोपींच्या छायाचित्रासह फलक छापण्यात आले आहेत. देशमुख हत्याप्रकरणात एकूण सात जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार यांना अटक करण्यात आली, तर वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत आहे. कराड ३१ डिसेंबरला सीआयडीला पुण्यात शरण आला आहे. खून प्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे यांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे बीड पोलिसांनी पसार तीन आरोपींना ‘वाँटेड’ घोषित केले आहे.

हेही वाचा : सत्ता, श्रीमंती मिरवण्यासाठी कंबरेला पिस्तूल, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात लाखोंची ‘हौस’

कराडला सोडणारे वाहन पवारांच्या ताफ्यात कसे?

वाल्मिक कराडला पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण कार्यालयात शरण येण्यासाठी आणून सोडणारे चारचाकी वाहन अजित पवार हे जेव्हा मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात होते, असा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. त्या आरोपाचे खंडण राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. वाहनावरून होणारे आरोप बेछूट, निरर्थक आहेत, असे तटकरे म्हणाले.

उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: अॅड. निकम यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात अभ्यास करून दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा : वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!

कराडचा एन्काऊंटरही होऊ शकतो वडेट्टीवार

संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयित वाल्मीक कराडला बनावट चकमकीत ठार केले जाण्याची भीती माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. कराड याचे बीड पोलीस ठाण्यात लाड केले जात आहेत. पोलीस ठाण्यात खाटा मागण्यात आल्या आहेत. वाल्मीक कराड याने आत्मसमर्पण करणे आणि त्यानंतर खाटा मागवणे हा योगायोग होऊ शकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाटांसंदर्भातील आरोप फेटाळून लावला. अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. त्यांना जमिनीवरच झोपवायचे का, असा सवाल करताना त्यांच्यासाठीच हे पलंग आणल्याचे त्यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed sarpanch santosh deshmukh murder absconded accused declared wanted adv ujjwal nikam css