छत्रपती संभाजीनगर : उपचाराच्या बहाण्याने आईसह मुलीचा विनयभंग प्रकरणात ५५ वर्षीय भोंदूबाबाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजारांचा दंड तर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातही तीन वर्षे सक्तमजुरीची आणि पाच हजार रुपयांचा दंड, अशा दोन गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. आर. उबाळे यांनी सुनावली आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये शिवीगाळ केल्यावरून दाखल गुन्ह्यातून मात्र, आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
साईनाथ कारभारी गुंजाळ (रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे शिक्षा सुनावलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. या प्रकरणात विवाहितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, डिसेंबर २०२० मध्ये फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला उलट्या व पोटाचा त्रास सुरू झाला होता. त्यांनी अनेक दवाखाने करूनही त्रास थांबत नव्हता.
तेव्हा त्यांना घृष्णेश्वर कॉलनीतील एका बाबाकडे जाण्याचा सल्ला परिचितांकडून देण्यात आला. त्यानुसार फेब्रुवारी २०२१ रोजी फिर्यादी कुटुंबासह बाबाकडे गेले. त्यावेळी मुलीचा त्रास कमी झाल्याने फिर्यादीच्या कुटुंबाचा त्याच्यावरील विश्वास वाढला, ते पुन्हा-पुन्हा त्याच्याकडे जावू लागले.
१३ फेब्रुवारी रोजी भोंदू बाबाने दोघींना वेगवेगळे बसवून डोळे बंद करण्यास सांगितले. आरोपीने विवाहितेचा पायाचा इलाज करण्याच्या नावाखाली विनयभंग केला. मात्र, मुलीचा आजार दुरुस्त झाल्याच्या अनुभवाने विवाहितेने दुर्लक्ष केले.
एकेदिवशी आरोपीने पुन्हा पीडितेच्या पतीला पुरुषार्थावरून बोलण्यासारखा प्रकारही केला. त्यानंतर मुलीने बाबाकडे जाण्यासाठी नकार दिला. त्यामागचे कारण विनयभंग असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित कुटुंबाला धमकावण्यासही सुरवात केली. या भीतीतून पीडितेने हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भाेंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात सहायक लोकभियोक्ता अजित अंकुश यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
