छत्रपती संभाजीनगर – थेट जनतेतून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जात समुहांतील समीकरणांची आकडेमोड करून उमेदवार आणि प्रमुख पक्षांकडून जुळवाजुळव करण्यात येत असून, सामाजिक अभिसरण (सोशल इंजिनिअरिंग) साधण्यात येईल, अशी शिकस्त सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गासाठी सुटलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडून मागासवर्गीय (दलित), मुस्लीम व लिंगायत या तीन घटकांची अधिकाधिक मते मिळवण्यासाठी आकडेमोड आणि भेटी-गाठीवर भर देण्यात येत आहे.

प्रमुख मठांमधील लिंगायत समाजातील धर्मगुरूंची भेट घेतली जात आहे. मातंग समाजातील एक प्रमुख क्रांतीगुरु लहुजी साळवे यांची जयंती १४ नोव्हेंबर रोजी झाली असून, या निमित्तानेही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोतील बळीराम पाटील शाळेच्या समोरील भागातील लहुजी चौकासह वेगवेगळ्या शहरांमधील चौकांमध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. त्याला इच्छुकांनी आवर्जून काहींनी हजेरी लावली तर काहींना निमंत्रित करण्यात आले होते.

“मामुली”च्या चर्चेमागचा इतिहास

विधानसभेच्या १९९५ सालच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील तत्कालीन महसूल, सांस्कृतिकमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये त्यांच्या प्रचारात “मामुली लोक” असा शब्दप्रयोग केला होता. हा मामुली शब्द विलासरावांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासाठी वापरला होता. विलासराव राज्यातील मातब्बर मंत्री तर कव्हेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती. परंतु कव्हेकर यांनी “मामुली” या शब्दाचा रोख स्थानिक मारवाडी, मुस्लीम व लिंगायत या समाजाकडे असल्याचा प्रचार केला. त्यातून जनमत विलासरावांविरोधात गेले आणि त्यांचा ३५ हजार मताधिक्याने पराभव झाला, हा इतिहास आहे.

मुस्लिम मतांसाठी नव्या आघाड्या

अंबाजोगाई पालिका निवडणुकीमध्ये राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा यांनी स्वतंत्र आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ मुस्लिम मतांचा विचार करुन घेतला असल्याची चर्चा अंबाजोगाईमध्ये सुरू आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपच्या नमिता मुंदडा या करतात. नंदकिशोर मुंदडा हे त्यांचे सासरे होत.

मुस्लीम मतदारांची संख्या

बीड जिल्ह्यातील अडीच लाखांवर मतदार मुस्लीम समुदायातून येणारे आहेत. मुस्लीम समाजापर्यंत मोदी सरकारच्या विविध योजनांच्या आधारे पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. – सलीम जहांगीर, प्रदेश महामंत्री, अल्पसंख्याक विभाग, भाजपा</strong>

लिंगायत मतदानाविषयी

बीड जिल्ह्यात लिंगायत समाजाची दीड लाखांवर मतदारांची संख्या आहे. एकट्या परळी शहरात २० हजारांच्या संख्येने मतदार आहेत. – दत्ताप्पा इटके, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वीरशैव सभा

मागासवर्गीय मते किती ?

बीड जिल्ह्यात मागासवर्गीय घटकातील चार प्रमुख जातींसह सव्वा तीन ते साडे तीन लाख मतदारांची संख्या आहे. – पप्पू कागदे, युवक प्रदेशाध्यक्ष, रिपाइं (आठवले).