"...तेव्हाच जल्लोष करू," औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान | chandrakant khaire criticize eknath shinde and devendra fadnavis on renaming of aurangabad city | Loksatta

“…तेव्हाच जल्लोष करू,” औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर चंद्रकांत खैरेंचे शिंदे सरकारला आव्हान

या प्रस्तावानुसार औरंगाबाद शहारचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात येणार आहे.

chandrakant-khaire
चंद्रकांत खैरे (संग्रहित फोटो)

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला अगोदर स्थगिती देऊन आज नव्याने या फेरप्रस्तावाला मान्यता दिली. या प्रस्तावानुसार औरंगाबाद शहारचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. एका महिन्याच्या आत केंद्र सरकारकडून या नामांतराबाबतची मंजुरी घेऊन यावी, असे खैरे म्हणाले आहेत. ते औरंगाबाद शहरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

“औरंगाबाद शहराच्या नामांतराची मागणी लांबणीवर पडली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र श्रेय लाटण्यासाठी शिंदे सरकारने हाच निर्णय पुन्हा घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही नेहमीच मानतो. म्हणूनच विचार करुन आम्ही विमानतळाच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

हेही वाचा >>> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

शिंदे सरकारच्या या निर्णयावर पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या नामकरणाच्या प्रस्तावावर केंद्र सरकारची मंजुरी मिळवून आणावी, अशी मागणी केली. “औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय थांबवल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला. आम्ही निषेध व्यक्त केल्यानंतर त्यांना जाग आली. म्हणून आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. आम्ही तुमचे आभार मानणार नाही. राज्य सरकारने पुढील एका महिन्यात या निर्णयावर केंद्र सरकारची मंजुरी घेऊन यावी, अशी मागणी आम्ही करतो,” असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

हेही वाचा >>> संजय राऊतांच्या ‘एक दूजे के लिए’ टीकेवर एकनाथ शिंदेंचा टोला; म्हणाले, “अरे बाबा आता…!”

पुढे बोलताना “हे अतीहुशार आहेत. संभाजीनगर हे नाव सोपं होतं. मात्र त्यांनी मुद्दामहून छत्रपती संभाजी महाराज नगर असे नाव केले. संभाजी महाराज हे सर्वांचेच आहेत, त्यामुळे हरकत नाही. पण प्रत्यक्षात या नावाला एका महिन्यात केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून आणावी. अद्याप आम्हाला आनंद झालेला नाही. केंद्र सरकारने याला मान्यता दिल्यानंतर आम्ही जल्लोष करु. केंद्राकडून हे नाव मंजूर करून आणण्यासाठी दोन राज्यमंत्री आहेत. त्यांनी ही मंजुरी मिळवून आणावी,” अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.

हेही वाचा >> गुजरात दंगल प्रकरण : “काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींविरोधात कट रचला होता”; तपास यंत्रणांचा दावा

“बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेचा मान त्यांनी उशिरा ठेवला. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी हा निर्णय का घेतला नाही? हे सगळं श्रेय लाटण्यासाठी आहे. पण हे श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच मिळणार आहे,” असे म्हणत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-07-2022 at 14:22 IST
Next Story
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराच्या स्थगितीवरून शिंदे यांची माघार ; चौफेर टीकेनंतर आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक