जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोकरा’ योजना अंतर्गत जालना जिल्ह्यात अनुदानावर उभारण्यात आलेल्या शेडनेट गृहांच्या गैरप्रकाराची चौकशी सध्या कृषी विभागाच्या पथकांमार्फत सुरू आहे. यासोबतच ‘पोकरा’ मधील औजार बँक, प्रक्रिया संस्था, गोदामे, ठिबक सिंचन, फवारणी यंत्रणा, मालवाहू वाहने इत्यादी संदर्भात चौकशी झाली तर जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा गैरप्रकार उघडकीस येईल, असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश गवळी यांनी बुधवारी येथे वार्ताहर बैठकीत केला.
गवळी यांनी सांगितले की, कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने ७० शेडनेट तपासणीत अनियमितता आढळून आल्याने यासंदर्भात ५६ लाख ७७ हजारांची वसुली संबंधित जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांवर प्रस्थापित केली आहे. परंतु त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यास मार्च २०२४ मध्ये पदोन्नती देण्यात आली. नंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कामासाठी केलेल्या दौऱ्यांमध्येही शासकीय वाहन वापरासाठी लागलेले डिझेल आणि वाहन दुरुस्तीच्या बिलांमध्येही गैरप्रकार झाला आहे. कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने केलेल्या अभिप्रायानुसार करण्यात आलेल्या १ हजार ७५ शेडनेटच्या अंतर्गत लेखा परीक्षणात २ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वसुली पात्र दाखविण्यात आले आहे.
सर्वच्या सर्व ३ हजार २५८ शेडनेटचे अंतर्गत लेखापरीक्षण केले पाहिजे. त्यामुळे मोठा गैरप्रकार बाहेर येईल. यासंदर्भातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले असतानाही तत्कालीन जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नाही. त्यानंतर २० ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय पातळीवरून गुन्हे नोंदविण्यास स्थगिती देण्यात आली.
‘पोकरा’ अंतर्गत शेडनेट प्रमाणेच ठिबक सिंचन आणि फवारणी यंत्रणांच्या अंमलबजावणीतही गैरप्रकार झाले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेल्या पडताळणीत २ हजार ३८१ शेडनेट पैकी १ हजार १५३ शेडनेटमध्ये पुरवठादारांची नोंदणीच नसल्याचे आढळून आलेले आहे, मार्गदर्शक सूचनेप्रमाणे विद्युत मोटार आणि संबंधित यंत्रणा ‘आयएसआय’ प्रमाणित असलेली घेण्यात आलेली नाही, अनेक लाभधारकांच्या प्रशिक्षणाची प्रमाणपत्रेही बनावट तयार करण्यात आली आहेत, काही लाभार्थ्यांना नियमापेक्षा अधिक अनुदान देण्यात आलेले आहे, गोदाम आणि शेतमाल संकलन केंद्र नसतानाही संबंधित लाभार्थ्यांना वाहनांवर अनुदानात देण्यात आले आहे, औजारे बँक अनुदानातही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे इत्यादी आरोपही गवळी यांनी केले.