छत्रपती संभाजीनगर : लातूर शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी केलेल्या कारवाईत ३ लाख ९४ हजार ९०० रुपये किमतीचे ७८.७८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आणि एक गावठी पिस्टल, असा ७ लाख ९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एल.आय.सी कॉलनी परिसरातील एका घरामध्ये एमडी ड्रग्ज असल्याच्या माहितीवरून छापा मारला. गणेश अर्जुन शेंडगे (वय २६, रा. लातूर), रणजीत तुकाराम जाधव (वय २४, रा. गोदावरी राणीचाळ, दहिसर पूर्व, मुंबई) व एक फरार आरोपी, या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या नमूद आरोपींनी एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची अवैध विक्री करणेसाठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ (ड्रग्स), गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.