छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद क्षेत्राअंतर्गत परळी-वैजनाथ हे शेवटचे एकमेव रेल्वे स्थानक असून, येथे येणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे इंजिन बदलावे लागते. परिणामी सुमारे वीस मिनिटे ते अर्धा तासाचा वेळ जात असून, या फेऱ्यातून सुटका करणारी घाटनांदूर-वडगाव-निला या नवीन बाह्यवळण मार्गिकेच्या (बायपास लाईन) कामाने मात्र अद्याप अपेक्षित गती घेतलेली नाही. तर लातूररोडनजीकच्या घरणीगाव ते वडवळ नागनाथ दरम्यानच्या रेल्वे वळण रस्त्याची जमीन अधिग्रहण प्रक्रिया पार पडली आहे.

रेल्वे मंत्रालयाने जुलै २०२२ मध्ये ‘मिशन ३००० एमटी’ अंतर्गत १३ स्थानक परिसरात बाह्यवळण मार्गिका निर्माणाच्या संदर्भाने एक निर्णय घेतला आहे. त्यासाठी २९ कोटी ११ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन टप्पे असून, दुसरा प्रस्तावित टप्पा हा दक्षिण मध्ये रेल्वेच्या सिकंदराबाद क्षेत्रिय विभागातील असून, त्यामध्ये विकाराबाद, विष्णूपूरम, विजयवाडा, परळी व लातूररोड या स्थानक परिसरात बाह्यवळण मार्ग तयार करण्याचा आहे. यात लातूररोडनजीकच्या घरणीगाव ते वडवळ नागनाथदरम्यान व परळी रेल्वे स्थानकापासून १.६७ किमी अंतरावरील घाटनांदूर-वडगाव-निला या वळण मार्गाचा समावेश आहे. या ठिकाणी इंजिन न बदलता येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे पुढे मार्गक्रमण करीत जातील. शिवाय मालगाड्या येताना अन्य रेल्वेंना नाहक २० ते ३० मिनिटे पुढील मार्गक्रमणासाठी प्रतीक्षेत थांबावे लागण्याची गरज उरणार नाही.

परळी रेल्वे स्थानकातील इंजिन बदलाचा फेरा आणि त्यासाठी लागणारा सुमारे अर्धा तासाचा वेळही वाचणार असून, त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे येथून जाण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. परंतु, हे काम सध्या रखडले असून, अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची माहिती आहे.

परळीजवळील रेल्वेच्या बाह्यवळण मार्गासाठीची जमीन भूसंपादन प्रक्रिया आमच्या कार्यालयीन स्तरावरून पूर्ण झालेली आहे. – अरविंद लाठकर, उपविभागीय अधिकारी.

परळीतील रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त नवीन बायपास लाईन निर्मितीचे काम प्रलंबित आहे. प्रस्तावित मार्ग माल वाहतूकसाठी वापरला जाणार असला तरी भविष्यात या नवीन रेल्वे मार्गे लांब पल्ल्याच्या, वंदे-भारतसारख्या गाड्या सुरू होतील. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे तीर्थक्षेत्रही ठळकपणे देशाच्या नकाशावर येईल. काम रखडल्याने मंजूर निधी परत जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. – चेतन सौंदळे, शहराध्यक्ष मजविप, परळी.

लातूररोडजवळील घरणीगाव ते वडवळ नागनाथदरम्यान प्रस्तावित रेल्वे वळण मार्ग असून, त्याची प्रशासकीय पातळीवरील जमीन अधिग्रहण, मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शासकीय निधीही रेल्वेकडून पोहोचती झालेला आहे. वळण मार्गामुळे मालगाड्या थेट जातील व प्रवासी रेल्वेंना त्यासाठी थांबावे लागणार नाही. – मोतीलाल डोईजडे, सदस्य, क्षेत्रिय उपभोक्ता समिती, सिकंदराबाद रेल्वे विभाग.