छत्रपती संभाजीनगर : राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व नुकसानीची रास्त भरपाई सर्व नुकसानग्रस्तांना द्या या प्रमुख मागण्यांसाठी येत्या १० ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) व अखिल भारतीय शेतमजूर युनियन या संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कॉ. डॉ. अजित नवले यांनी दिली.

ओल्या दुष्काळासंदर्भातील मागण्यांबाबत या तीनही संघटनांनी नुकताच मराठवाड्याचा संयुक्त दौरा केला. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचा एक जबरदस्त मोर्चा या प्रश्नांसाठी ३० सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला. आता या आंदोलनाचा विस्तार करत संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांवर १० रोजी मोर्चे काढून ओल्या दुष्काळा संदर्भातील प्रश्न केंद्रस्थानी आणले जाणार आहेत.

शेतकऱ्यांना प्रति एकर रु. ५० हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून ३० हजार रुपये द्या, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा, कर्जमाफी योजनेत पीक व शेती कर्जा बरोबरच बचत गट, सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, शेती, जनावरे, घरे, गोठे यांचे झालेले नुकसान सरकारी खर्चाने रोजगार हमी योजनेतून कामे काढत भरून द्या यासारख्या १० मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकार मात्र अशा भीषण परिस्थितीत सुद्धा केवळ मदतीच्या वल्गना करत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण श्रमिकांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष खदखदतो आहे. हा असंतोष इतरत्र वळवण्यासाठी विविध शेतकरी जातींमध्ये आपसात संघर्ष भडकवले जात आहेत. एकमेकांवर गलिच्छ पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत शेती व मातीच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र केले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर शेती व मातीचे प्रश्न केंद्रस्थानी राहावेत यासाठी या तीनही संघटना एकोप्याने रणांगणात उतरल्या आहेत.

१० ऑक्टोबरच्या राज्यव्यापी आंदोलनानंतरही सरकारने वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. ऑनलाईन बैठकीस डॉ. अशोक ढवळे, नरसय्या आडम, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, नथू साळवे, मारोती खंदारे, उमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.