छत्रपती संभाजीनगर : तेलंगणास पाणी सोडताना कोणत्या दिवशी दरवाजे बसवावेत आणि उघडावेत याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील नेत्यांमध्ये बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. नायगावचे आमदार राजेश पवार, श्रीजया चव्हाण यांनी हा प्रश्न मांडला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बाभळीचे बंधारे उघडण्याच्या तारखा ठरल्या आहेत. या तारखांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत नवी याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे.
बाभळी बंधाऱ्याबाबत सुचविण्यात आलेल्या पर्यायांना विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जून रोजी बाभळी बंधाऱ्याबाबत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मी स्वतःदेखील तेलंगणाच्या जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहून, त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेत दिली. तेलंगणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तसे न घडल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायालयीन लढ्यासह आवश्यक ती पावले उचलली जातील, असे ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात लढा देणारे बालाजी कोप्पनवार म्हणाले, ‘बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे पावसाळ्यात बसविण्याची विनंती केली जात आहे. २.७४ अब्ज घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर जलपातळी स्थिर ठेवून पाणी पोच्चमपाड धरणाला सोडता येईल. पाणी वापर योग्य व्हावा म्हणून १३ उपसासिंचन योजनांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बाभळी बंधाऱ्याच्या बुडित क्षेत्रातील ३४८ हेक्टर क्षेत्र संपादित करून २०२४ च्या अर्थसंकल्पातील तरतूद केलेल्या निधीचे वितरण करावे.’
या अनुषंगाने आमदार राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की हा प्रश्न नायगाव मतदारसंघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते माझ्या मदतीसाठी येत आहेत. त्याचा आनंद आहे. बाभळीचा प्रश्न सुटायला हवा.’ पावसाळ्यात पाणी सोडून द्यावे लागत असल्याने बहुतांश पाणी समुद्रात जाते. राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता पुढील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.