छत्रपती संभाजीनगर : परळी वैजनाथ येथे आयोजित घोंगडी बैठकीत रविवारी सायंकाळी बोलताना मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीस यांनी आपल्यावर सापळा लावला असून कुणबी नोंदी देण्याचे काम फडणवीस यांच्या सांगण्यावरून रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता कायम, संभाजीनगर पूर्व की मध्यचा पर्याय निवडणार ?

जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचे आमदारच गोरगरीब मराठ्यांच्या मुलांच्या मुळावर उठले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांस राजकीय सत्तेचा फायदा होऊ देणार नाही. मला राजकारणात यायचे नाही. आरक्षण दिले नाही तर मात्र, आपल्याला राजकारणात यावे लागेल. आमची लेकरं तुमचे सरकार व्यसनी बनवत आहेत, असा आरोप करून जरांगे यांनी, तुमचे ११३ आमदार आम्ही पाडू, असा इशाराही दिला.

धनंजय मुंडे- जरांगे यांची भेट?

मनोज जरांगे यांची मध्यरात्री कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याची चर्चा दिवसभर माध्यमांमध्ये सुरू होती. या भेटीत शेतीतील नुकसान आणि भरपाई देण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे यांनी ही भेट झाल्याचे माध्यमांना सांगितले असले तरी धनंजय मुंडेंकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.