छत्रपती संभाजीनगर : छावणीतील विद्यादीप बालगृहातील नऊ मुलींनी पलायन केल्यानंतर छळाच्या तक्रारी समोर आल्या. त्यानुसार छावणी पोलीस ठाण्यास पत्र दिले होते, त्याप्रकरणी छळाबाबत काय कारवाई केली, त्यादृष्टीने काय पावले उचलली, तसेच ‘विद्यादीप’चा परवाना संपल्यानंतर संबंधित मुलींचे इतर बालगृहात कायद्यानुसार स्थलांतर केव्हा करणार व बचपन बचाओ आंदोलन निर्देशांचे अनुपालन अहवाल, यासंदर्भातील शपथपत्र एक आठवड्यात सादर करावे, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी २५ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

विद्यादीप बालगृहामधील मुली पळून गेल्याच्या घटनेची नोंद घेत औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो (स्वतःहून) याचिका दाखल करून घेतलेली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाचे मित्र प्रशांत कातनेश्वरकर यांनी याचिका तयार करून उच्च न्यायालयात सादर केली. याप्रकरणी वरील आदेश खंडपीठाने दिले आहेत. याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील बचपन बचाव आंदोलनाच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला.

राज्य सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली, की या संदर्भात ९ जुलै २०२५ रोजी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

महिला व बालकल्याण विभागाकडून विद्यादीप बालगृहातील मुलींचे दुसऱ्या बालगृहात स्थलांतराबाबत निर्देश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने बचपन बचाव आंदोलन याचिकेमधील उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांची सखोल चर्चा करत राज्य सरकारने याबाबत काय पावले उचलली अशी विचारणाही खंडपीठाने केली. हे प्रकरण केवळ विद्यार्थी बालगृहापर्यंत मर्यादित न ठेवता सदर घटनेच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच बालगृहासंदर्भात आहे, असे खंडपीठाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने काही अंतरिम आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘विद्यादीप’चा परवाना संपल्यानंतर तेथील मुलींचे इतर बालगृहात कायद्यानुसार स्थलांतर केव्हा करणार, बालकल्याण समितीने २०२३ मध्ये विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळाबाबत कारवाईचे पत्र छावणी पोलीस ठाण्यात दिलेले होते, त्याबाबत काय पावले उचलली त्याची ही माहिती सादर करावी. छावणी पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने बाल संरक्षण कायद्यानुसार तपास अधिकारी व तपासाची कारवाई करावी आदींसंदर्भाने शपथपत्र एक आठवड्यात सादर करावे, असे आदेश दिले आहेत.