छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नवउद्यमी (स्टार्टअप) तरुणांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी ६ टक्के व्याजाने कर्ज देणारी मुख्यमंत्री स्वयंम उद्योजकता व नाविन्यता महाफंड योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार ६ टक्क्यांपैकी ३ टक्के व्याज सरकार भरणार आहे. कर्ज घेणाऱ्या तरुणांना केवळ ३ टक्केच व्याज भरावयाचे आहे. या योजनेचा शुभारंभ येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी सकाळी येथे दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एआयसी बामु फाउंडेशन’द्वारा संचालित ‘स्टार्टअप यात्रा’ या उपक्रमाचे उदघाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. प्रवीण वक्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे, एमडी मुकुंद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील आैद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जातून चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे. जागतिक बँकेने सुमारे बाराशे कोटी रुपयांची मदत केली आहे. या कामामध्ये सरकारचा एक पैसाही लागणार नाही.
आैद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, जुने, कालबाह्य अभ्यासक्रम बंद करण्यात येतील किंवा काही अभ्यासक्रमाला नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, सौर पॅनल दुरुस्ती, इलेक्ट्रिक वाहन दुरुस्तीसारखे सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. पुढील वर्षापासून आैद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून नोकरीच्या संधी (कॅम्पस) उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.
सर्व आैद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचेही अधिकारही संस्था पातळीवर देण्यात आल्याचे सांगून मंत्री लोढा म्हणाले, काही अल्प मुदतीच्या कालावधीचेही अभ्यासक्रम यापुढे दिसतील. लहान-मोठे मिळून १७० अभ्यासक्रम असून, आैरंगाबाद विभागातच ४३० अभ्यासक्रम सुरू आहेत. मराठवाड्यातील संस्थांमध्ये ९७ टक्के प्रवेश पूूर्ण होत आहेत. यापुढे आैद्योगिक क्षेत्रातील कामही आयटीआयमध्ये देण्यात येणार असून, यातूनच चेहरा-मोहरा बदललेला दिसेल.
संस्थांमध्ये शिक्षक भरती
आैद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन भरती करण्यात येणार आहे. ५० टक्के नवीन शिक्षकांच्या व ५० टक्के आैद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, अभ्यासकांच्याही जागा भरण्यात येणार आहेत. पुढील महिन्यात अनुकंपा तत्त्वावरील जागाही भरण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार बैठकीत दिली.
७५ हजार तरुणांना रोजगार
‘स्टार्टअप यात्रा’ या उपक्रमाचे उदघाटन प्रसंगी कौशल्य विभागाच्या विविध उपक्रमांची रुपरेखा स्पष्ट करताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विभागाने नुकतेच इनोव्हेटिव्ह महाराष्ट्र राज्य स्टार्टअप्स २०२५ हे धोरण आणले आहे. त्यानुसार मुखयमंत्री स्वयंम उद्योजकात व नाविन्यता महाफंड उभारण्यात येणार आहे. शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षितांना ई-मेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केले जाईल. त्यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल. पुढील चाळणीनंतर १ लाख उमेदवारांना स्पर्धा, हॅकेथाॅन व चाचण्यांतून संधी दिली जाईल. अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक उमेदवारांना नवउद्यमी करण्यासाठी सर्वांगाने प्रशिक्षण देऊन उद्योजकांची एक फळी तयार केली जाईल.