छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेसला तीन खासदारांचे बळ असल्याने जातनिहाय जनगणनेच्या काँग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मे अखेरपर्यंत हा मेळावा घेण्याविषयी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर बोलणी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘ओबीसी’चा मेळावा घेतला जावा आणि त्याला काँग्रेसच्या वरिष्ठांनी यावे अशी चर्चा सुरू होती. मात्र, हा कार्यक्रम सर्वसमावेशक असावा, अशी तयारी आता सुरू करण्यात आली आहे. खासदार कल्याण काळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या कार्यक्रमास राहुल गांधी यांनी यावे, असेही प्रयत्न केले जात आहेत.
जालना लोकसभा निवडणुकीमध्ये ‘मराठा’ विरुद्ध ‘ओबीसी’ असा संघर्ष उभा ठाकलेला होता. या संघर्षातून निर्माण झालेल्या सत्ताधारीविरोधी वातावरणाचा लाभ काँग्रेसला मराठवाड्यात झाला. खासदार कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, रवींद्र चव्हाण निवडून आले. आठपैकी महायुतीमध्ये केवळ शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. ताकद वाढल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी संघटनात्मक बाबींवर विविध कार्यक्रम आखणीस सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना यात्रेतून काँग्रेसची प्रतिमा अधिक उजळून निघावी असे कार्यक्रम घेतले. आता जातनिहाय जनगणेनेचे श्रेय काँग्रेसचे आहे, हे रुजविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ओबीसी’चा एक स्वतंत्र मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. या कार्यक्रमास खासदार प्रियंका गांधी यांनी यावे अशी चर्चा झाली हेाती. मात्र, एकाच प्रवर्गासाठी कार्यक्रम न घेता तो सर्व जातसमूहांना सामावून घेणारा असावा, अशी चर्चा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाली. परभणी येथील कार्यक्रमात रमेश चेन्नीथला यांनी जातनिहाय जनगणनेचे श्रेय काँग्रेसचे आहे, हे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली जात आहे.
या अनुषंगाने कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘जातनिहाय जनगणना ही काही शिरगणती नाही. त्यामुळे या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम व्हायला हवेत. गेल्या काही वर्षांत शेती आणि बेरोजगारीच्या प्रश्नातून नोकरी हा प्राधान्यक्रम झाला आहे. त्यातून आरक्षणाची मागणी विविध राज्यांतून होत आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेवर चर्चा सुरू व्हायला हव्यात. त्याचा एखादा कार्यक्रम जालन्यात करत येऊ शकेल का, याची चर्चा सुरू आहे. पण कार्यक्रम नक्की ठरलेला नाही.’