छत्रपती संभाजीनगर : पहलगाम आतंकवादी भ्याड हल्ल्यामध्ये देशातील २६ भावा-बहिणींचे रक्त सांडले. त्या रक्ताच्या डाग अजून पुसले गेले नाहीत तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिली गेली. केंद्र सरकार देशातील जनतेच्या भावनांची खेळत असल्याचा आरोप करत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील क्रांती चौकात रविवारी (१४ सप्टेंबर) “माझं कुंकू माझा देश” हे आंदोलन करण्यात आले.

‘माझं कुंकू माझा देश’. ‘केंद्र सरकार हाय हाय’ . अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. आंदोलन स्थळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुंकू आणले होते. ते पंतप्रधानांना पाठविले जाईल असे शिवेसेनेच्या नेत्यांनी सांगितले. “खून और पाणी एकसाथ बह नही सकते” असे म्हणणारे पंतप्रधान आता “खून और क्रिकेट एकसाथ” कसं खेळू शकतात, ऑपरेशन सिंदूर कुठे आहे, असा प्रश्न महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी माजी महापौर शीला गुंजाळ, महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनिता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, लता पगारे, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री याची उपस्थिती होती. शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.